Rahul Dravid Statement: 26 डिसेंबर पासून दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत यांच्यामध्ये पहिली टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. यावेळी विकेटकीपर म्हणून कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केएस भरतची फलंदाजीची बाजू कसोटी क्रिकेटमध्ये कमकुवत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाकडे इशान किशनच्या रूपाने दुसरा पर्याय होता, पण त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत भारतीय टीम मॅनेजमेंटकडे के.एल राहुल हा सर्वोत्तम पर्याय आहे.
राहुल द्रविड यांनी सांगितलं की, 'मी याकडे एक आव्हान म्हणून पाहतोय. काहीतरी वेगळे करण्याची ही त्यांच्यासाठी नक्कीच संधी आहे. इशान किशन येथे नसल्यामुळे त्याला ही संधी मिळाली. आमच्याकडे निवडण्यासाठी दोन विकेटकीपर आहेत. त्यापैकी एक के.एल राहुल आहे. आम्ही त्याच्याशी याबद्दल चर्चा केली असून त्याला खात्री पटली. ही भूमिका साकारण्यासाठी तो उत्सुक आहे.
राहुल द्रविड पुढे म्हणाले की, टेस्ट क्रिकेटमध्ये विकेटकिपींगचं आव्हान पूर्णपणे वेगळं आहे. त्याला विश्वास आहे की राहुलने 50 ओव्हर्सच्या फॉर्मेटमध्ये ही भूमिका चांगली बजावली आहे. आम्हाला माहित आहे की, त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये विकेटकिपींग केली नाहीये. पण 50 ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तो विकेटकिपींगमध्ये चांगली कामगिरी करतो.
गेल्या पाच-सहा महिन्यांत त्याने चांगली तयारी केलीये. राहुल साठी हे एक नवीन आव्हान असेल, असंही द्रविड यांनी सांगितलंय.
आम्ही विश्वचषकात हरलो, हे निराशाजनक आहे. पण, आम्ही आता ते विसरून पुढे जातोय. प्रत्येक वेळी तुम्ही आऊट झालात, तेव्हा तुमची निराशा होतेच की... तुम्हाला पुढच्या डावात कामगिरी करायची आहे, त्यामुळे जुनी निराशा तुम्ही तुमच्यासोबत राहू देऊ शकत नाही. क्रिकेटपटू असल्याने त्याला कसं सामोरं जायचं हे तुम्ही लहानपणापासून शिकता. असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.