ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व कोणाकडे? ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डकडून लवकरच घोषणा

टिम पेननंतर कोण होणार कांगारू संघाचा कर्णधार? ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड म्हणालं...

Updated: Nov 19, 2021, 09:33 PM IST
ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व कोणाकडे? ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डकडून लवकरच घोषणा title=

नवी दिल्ली: एशेज सीरिज सुरू होण्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला मोठा झटका लागला आहे. टिम पेनने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. 

होबार्टमधील एका पत्रकार परिषदेत पेनने जाहीर केलं की, ऑफ-फील्ड वादाच्या बातम्या आल्यानंतर कर्णधारपद सोडल्याचा निर्णय घेतला आहे. पेन म्हणाला की, हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण आहे. पण हा निर्णय माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य निर्णय आहे असं मला वाटतं.

दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार पॅट कमिन्स असू शकतो. आता तो उपकर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी येऊ शकते. ऑस्ट्रेलिया बोर्ड मार्नश लबुशाने याच्या नावाचाही विचार करत आहे. 

8 डिसेंबरपासून एशेज सीरिज सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार कोण असणार याची चर्चा रंगली आहे. सध्या तरी तात्पुरता कार्यभार हा पॅट कमिन्सकडे सोपवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दक्षिण आफ्रिकेतील वादानंतर, स्टीव्ह स्मिथच्या जागी पेनची 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 46 वा कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. 2019 च्या एशेज मालिकेदरम्यान त्याने संघाचे नेतृत्व केलं. ऑस्ट्रेलियाने 18 वर्षांमध्ये प्रथमच परदेशी भूमीवर प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) अध्यक्ष रिचर्ड फ्रायडेन्स्टाईन म्हणाले की, बोर्डाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेणे आपल्या कुटुंबाच्या आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या हिताचे आहे, असे टिमला वाटत होतं.