कोलकाता : क्रिकेटच्या मैदानात होणाऱ्या अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी गोव्यामध्ये क्रिकेट खेळत असताना एका रणजीपटूचा मृत्यू झाला तर दक्षिण आफ्रिकेत क्लब क्रिकेट खेळत असताना एका क्रिकेटपटूला जीव गमवावा लागला. ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फिल ह्यूजस याचा डोक्याला बॉल लागल्यामुळे मृत्यू झाला. भारतामध्ये क्रिकेटच्या मैदानातल्या अपघाताची आणखी एक घटना घडली आहे.
भारताचा फास्ट बॉलर अशोक दिंडाच्या डोक्याला बॉल लागला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात अशोक दिंडा मुश्ताक अली चॅम्पियनशीप टी-२० चा सराव सामना खेळत होता. यावेळी बॉलिंग करत असताना बॅट्समननं मारलेला शॉट थेट अशोक दिंडाच्या डोक्याला जाऊन आदळला. बॉल आदळल्यामुळे अशोक दिंडा खेळपट्टीवरच कोसळला.
#WATCH:Pacer Ashok Dinda got injured after he was hit on forehead at Eden Gardens in Kolkata today during Bengal's T20 practice match for Mushtaq Ali championship.A medical team treated Dinda&he completed over after that.Doctors conducted his CT Scan&said there is nothing serious pic.twitter.com/XpT6FOTAFJ
— ANI (@ANI) February 11, 2019
डोक्याला बॉल लागल्यानंतर ओव्हर पूर्ण करून अशोक दिंडा पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अशोक दिंडावर उपचार करण्यात आले. कोणताही धोका नको म्हणून डॉक्टरांनी अशोक दिंडाचं सीटी स्कॅनही केलं. अशोक दिंडाला गंभीर दुखापत झाली नसल्याचं सीटी स्कॅनमधून निष्पन्न झालं आहे. असं असलं तरी अशोक दिंडाला २ दिवस आराम देण्यात येणार आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट टीमच्या अधिकाऱ्यानं दिली. मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमध्ये बंगालची टीम त्यांची पहिली मॅच २१ फेब्रुवारीला मिझोरामविरुद्ध कटकमध्ये खेळेल.
३४ वर्षांच्या अशोक दिंडानं भारताकडून १३ वनडे मॅच खेळल्या आहेत. या मॅचमध्ये दिंडानं १३ विकेट घेतल्या आणि २१ रन केल्या आहेत. याचबरोबर ९ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये दिंडानं १७ विकेट घेतल्या आहेत. कोलकात्याच्या मेदिनीपूरमध्ये राहणाऱ्या दिंडानं भारताशिवाय बंगाल, आयपीएलमध्ये दिल्ली, कोलकाता, पुणे वॉरियर्स, पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, इस्ट झोन आणि भारत ए कडून क्रिकेट खेळलं आहे.