बायो-बबलचं उल्लंघन करणं अंपायरला पडलं महागात

इंग्लंडचे अंपायर मायकल गॉ यांना बायो बबलचं उल्लंघन करणं महागात पडलंय. काही दिवसांपूर्वी वर्ल्डकपमध्ये जैविकदृष्ट्या बायो-बबलचं उल्लंघन केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मायकेल गॉ यांना सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकातून वगळलं आहे.

Updated: Nov 4, 2021, 10:29 AM IST
बायो-बबलचं उल्लंघन करणं अंपायरला पडलं महागात title=

दुबई : इंग्लंडचे अंपायर मायकल गॉ यांना बायो बबलचं उल्लंघन करणं महागात पडलंय. काही दिवसांपूर्वी वर्ल्डकपमध्ये जैविकदृष्ट्या बायो-बबलचं उल्लंघन केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मायकेल गॉ यांना सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकातून वगळलं आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी, 41 वर्षीय मायकल गॉ मंजुरीशिवाय हॉटेलमधून बाहेर पडले. इतकंच नाही तर ते जैविक दृष्ट्या बायोबबल बाहेरील व्यक्तींना भेटले, त्यानंतर त्यांना सहा दिवसांच्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं.

ICC ने त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "जैविकदृष्ट्या सुरक्षित वातावरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ICC पुरुष T-20 2021च्या उर्वरित सामन्यांसाठी अंपायर मायकेल गॉ यांची नियुक्ती केली जाणार नाही."

गेल्या आठवड्यात रविवारी दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात गॉ अधिकृत भूमिका बजावणार होते. परंतु नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना वगळण्यात आलं आणि त्यांच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या माराइस इरास्मस मैदानात उतरले होते.

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला विजय

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 2 विकेट्स गमावत 210 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ 7 गडी गमावून केवळ 144 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने 3, रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. यासह आता टीम इंडियाचे 3 सामन्यांत 2 गुण झाले आहेत.