कॅप्टन्सी गमावल्यावर हार्दिक पहिल्यांदाच सूर्याला भेटला अन्...; मुंबई एअरपोर्टवरचा Video पाहाच

Pandya First Meet Captain Suryakumar Yadav: भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे जाईल असं मानलं जात होतं. मात्र निवड समितीने वेगळाच निर्णय घेत कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर पहिल्यांदा हे दोघे भेटले तेव्हा काय घडलं पाहा...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 23, 2024, 03:01 PM IST
कॅप्टन्सी गमावल्यावर हार्दिक पहिल्यांदाच सूर्याला भेटला अन्...; मुंबई एअरपोर्टवरचा Video पाहाच title=
मुंबई विमानतळवर दोघांची झाली भेट

Pandya First Meet Captain Suryakumar Yadav: भारतीय चाहत्यांची एक सर्वात मोठी चिंता काल मिटली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. श्रीलंकन दौऱ्यासाठी टी-20 संघांचं नेतृत्व हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवला सोपवण्यात आल्यानंतर हार्दिक कसा व्यक्त होईल यासंदर्भातील चिंता चाहत्यांना होती. मात्र हार्दिक आणि सूर्यकुमारमध्ये सारं काही अगदी उत्तम असल्याचं सोमवारी समोर आलेल्या एका व्हिडीओमधून दिसून आलं. सूर्यकुमारकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर हार्दिक त्याला भेटल्यावर कसा प्रतिसाद देईल याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु असतानाच कर्णधारपदाच्या अत्यंत चर्चेतील निर्णयानंतर हे दोघे पहिल्यांदाच समोर आले. त्यानंतर त्यांनी जे काही केलं ते पाहून चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

हार्दिकला मोठा धक्का

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर भारतीय संघाची धुरा टी-20 वर्ल्डकपमध्ये उपकर्णधार असलेल्या हार्दिककडे सोपवली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र निवड समितीने वेगळाच निर्णय घेतला. निवड समितीने अनेक गोष्टींचा विचार करुन क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटचं नेतृत्व टी-20 मधील जगातील अव्वल फलंदाज असलेल्या सूर्यकुमारकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हार्दिककडून उपकर्णधारपदही काढून घेण्यात आलं. झिम्बाब्वेमध्ये भारताला 4-1 असा मालिका विजय मिळवून देणाऱ्या शुभमन गिलकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आलं आहे. 

नक्की वाचा >> 'आमच्यातील मतभेदांसंदर्भात...'; जय शाहांबरोबरच्या वादावर गंभीर थेट बोलला; म्हणतो, 'माझं..'

पहिल्यांदा भेटल्यानंतर...

बीसीसीआयने सोमवारी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हार्दिक आणि सूर्यकुमार कर्णधारपदात बदल केल्यानंतर पहिल्यांदाच भेटल्याचं दिसत आहे. भारतीय संघ श्रीलंकेमध्ये टी-20 मालिकेसाठी रवाना होण्याआधी मुंबई विमानतळावर भेटला. कोलंबोला जाणारं विमान पकडण्याआधी सर्व खेळाडू विमानतळावर एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सायंकाळी विमानाचं टेकऑफ करण्याआधी झालेल्या या छोट्या गेट-टू-गेदरमध्ये प्रत्येक खेळाडू येऊन एकमेकांना मिठ्या मारत होता, हात मिळवत होता. हार्दिकही विमानतळावर आला तेव्हा त्याने सूर्यकुमारला हसत हसत मिठी मारल्याचा व्हिडीओत दिसत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

दोघेही मुंबई इंडियन्समधील सहकारी

खरं तर हार्दिक आणि सूर्यकुमार हे मुंबई इंडियन्सच्या संघातील सहकारी आहेत. मात्र भारतीय संघात नेतृत्व बदलानंतर दोघांमध्ये कटूता निर्माण झाली असेल का असा प्रश्न चाहत्यांना होता. मात्र तसं काहीही मुंबई विमानतळावर निघालेल्या टीम इंडियाला पाहिल्यानंतर दिसून आलं नाही. दोघेही हसत एकमेकांच्या गळ्यात पडले.