Video Kohli Chants In Bangladesh vs Afghanistan Match: वर्ल्डकप 2023 च्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने सहज विजय मिळवत आपल्या वर्ल्डकप मोहिमेला विजयाने सुरुवात केली. शनिवारी धर्मशाला येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानला कसाबसा 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. बांगलादेशचा कर्णधार शाकीब-उल-हसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मेहंदी हसन निराज आणि कर्णधार शाकीबने प्रत्येकी 3 फलंदाजांना बाद केल्याने अफगाणिस्तानचा डाव केवळ 156 धावांवर आटोपला. बांगलादेशने अवघ्या 34.4 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठलं. 6 गडी राखून बांगलादेशने हा विजय मिळवला. या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात आली नसली तरी सामन्यादरम्यान काही असे प्रसंग घडले की त्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तानदरम्यान होता मात्र धरमशालाच्या मैदानामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा जयघोष होताना दिसला. या मागे एक विशेष कारण होतं. नेमकं घडलं काय पाहूयात...
बांगलादेश 157 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर सामन्यात एका क्षणी मैदानात अचानक विराट कोहलीच्या नावाने, 'कोहली... कोहली'चा जय घोष होताना दिसला. नेमकं काय झालंय हे मैदानात उपस्थित असलेल्या दुसऱ्या स्टॅण्डमधील प्रेक्षकांना आधी कळलं नाही. मात्र ज्या स्टॅण्डमधून कोहलीचा जयघोष होत होता त्या ठिकाणी सीमारेषेजवळ अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक उभा होता. नवीन-उल-हकला पाहूनच ही घोषणाबाजी केली जात होती. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असल्याने नवीन-उल-हकला डिवचण्यासाठी मैदानात भारतीय प्रेक्षकांनी कोहलीच्या नावाने जयघोष सुरु केला.
नवीन-उल-हकला आधी अफगाणिस्तानच्या वर्ल्डकपच्या संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 2 वर्षांनी राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. वर्ल्डकपनंतर आपण निवृत्ती घेणार असल्याची घोषणा नवीनने यापूर्वीच केली आहे. मात्र नवीन आणि विराटचा वाद काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. त्यावरही नजर टाकूयात...
नवीन-उल-हक हा तोच खेळाडू आहे ज्याच्यामुळे विराट कोहली आणि गौतम गंभीरदरम्यान यंदाच्या म्हणजेच 2023 च्या एका सामन्यानंतर मैदानात वाद झाला होता. विराट कोहली आणि नवीन-उल-हकदरम्यान मैदानात मोठा वाद चांगलाच चर्चेत आला होता. इतकेच नाही तर सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना विराट कोहलीचा हात नवीन-उल-हकने झटकला. यावरुन विराटने नीवन-उल-हकला तिथेच झापलं. नंतर या वादात गौतम गंभीरने नवीन-उल-हकची बाजू घेत विराटशी वाद घातला.बरं हा वाद केवळ मैदानापुरता राहिला नाही तर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले. याच वादाचा वचपा काढण्यासाठी शनिवारच्या अफगाणिस्तानविरुद्ध बांगलादेश सामन्यात भारतीयांनी नवीन-उल-हकला डिवचलं. तुम्हीच पाहा या सामन्यातील व्हिडीओ...
'Kohli, Kohli' chants at Dharamshala Stadium in front of Naveen Ul Haq. pic.twitter.com/GJfDOpZyVB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2023
नवीन-उल-हक यानंतर संपूर्ण स्पर्धेदरम्यान खोचक पोस्टच्या माध्यमातून विराट कोहली आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध टीप्पण्या करत राहिला. कधी आरसीबी पराभूत झाल्यानंतर आंबे गोड असल्याची इन्स्टाग्राम स्टोरी तर कधी आरबीसी पराभूत झाल्यानंतर हसणारे मिम्स नवीन-उल-हकने शेअर केले होते. याच नवीन-उल-हकला आधी संघातून वगळून आता पुन्हा संघात संधी देण्यात आलेली नाही. नवीन-उल-हकने अफगाणिस्तानसाठी 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 14 विकेट्स आहेत.