एक मॅच सात रेकॉर्ड! 'विराट' कामगिरी सुरूच

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे. 

Updated: Sep 7, 2017, 09:04 PM IST
एक मॅच सात रेकॉर्ड! 'विराट' कामगिरी सुरूच title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे. एकमेव टी-20मध्ये विराट कोहलीच्या ५४ बॉलमध्ये केलेल्या ८२ रन्स आणि मनिष पांडेच्या नाबाद ५१ रन्समुळे भारतानं १७२ रन्सं आव्हान पार केलं. या विजयाबरोबरच विराट कोहलीनं तब्बल ७ रेकॉर्ड केली आहेत.

तिन्ही सीरिज जिंकणारा पहिला कॅप्टन

श्रीलंका दौऱ्यामध्ये भारतानं ३ टेस्ट, ५ वनडे आणि एकमेव टी-20 अशा सगळ्या ९ मॅच जिंकल्या. परदेश दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये जिंकणारा कोहली हा पहिला कॅप्टन ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियानं २००९-१०मध्ये पाकिस्तानला तिन्ही फॉरमॅटमध्ये हरवलं होतं. पण ऑस्ट्रेलियानं त्यांच्याच मायभूमीमध्ये या ९ मॅच जिंकल्या होत्या.

सगळ्यात जलद १५ हजार रन्स बनवणारा खेळाडू

आपली ५० वी टी-20 खेळणाऱ्या विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार रन्स पूर्ण केल्या आहेत. हे रेकॉर्ड करणारा कोहली सातवा भारतीय आणि ३३वा खेळाडू बनला आहे. ३३३व्या इनिंगमध्ये कोहलीनं १५ हजार रन्स केल्या आहेत. एवढ्या जलद १५ हजार रन्स करणारा तो पहिला खेळाडू ठरलाय. याआधी हाशीम आमलानं ३३६ इनिंगमध्ये १५ हजार रन्स बनवल्या होत्या.

चौथं अर्धशतक

आपली ५०वी वनडे खेळणाऱ्या विराट कोहलीनं श्रीलंकेविरोधात टी-20मध्ये लागोपाठ चौथं अर्धशतक बनवलं. असं करणारा विराट हा एकमेव खेळाडू बनला आहे. याआधी विराटनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ ४ अर्धशतकं केली होती.

५० व्या टी-20मध्ये अर्धशतक

आपली ५०वी टी-20 खेळणाऱ्या विराटनं या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. ५० व्या टी-20मध्ये अर्धशतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी तिलकरत्ने दिलशान, इओन मॉर्गन, शाहीद आफ्रिदीनं हे रेकॉर्ड केलं होतं.

सर्वाधिक रन्स करणारा भारतीय

विराट कोहली टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा भारतीय बनला आहे. टी २० मध्ये कोहलीच्या नावावर आता ६,९०७ रन्स आहेत. रैनाचं ६,८७२ रन्सचं रेकॉर्ड कोहलीनं मोडलं आहे. टी २० मध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट आठव्या क्रमांकावर आहे.

पाठलाग करताना सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू

कोहली टी-20 क्रिकेटमध्ये रन्सचा पाठलाग करताना सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू बनला आहे. विराट कोहलीनं न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅक्कलमचं रेकॉर्ड मोडलं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये रन्सचा पाठलाग करताना कोहलीच्या नावावर १०१६ रन्स आहेत. तर ब्रॅन्डन मॅक्कलमनं १००६ रन्स बनवलेत. मॅक्कलमनं १००६ रन्स ३८ इनिंगमध्ये आणि ३३.५३ च्या सरासरीनं बनवल्या आहेत. तर कोहलीनं फक्त २१ इनिंग आणि ८४.६६च्या सरासरीनं १०१६ रन्स बनवल्यात.

सर्वाधिक रन्स बनवणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

टी-20मध्ये विराट कोहलीनं १,८३० रन्स बनवल्या आहेत. टी-20मध्ये एवढ्या रन्स बनवणारा विराट हा तिसरा खेळाडू बनलाय. विराटनं न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलला(१८०६ रन्स) मागे टाकलं आहे. विराटच्या पुढे आता तिलकरत्ने दिलशान (१,८८९ रन्स) आणि ब्रॅन्डन मॅक्कलम (२,१४० रन्स) आहेत.