पत्रकाराच्या त्या प्रश्नावर भडकला विराट

इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं पराभव झाला.

Updated: Sep 13, 2018, 05:08 PM IST
पत्रकाराच्या त्या प्रश्नावर भडकला विराट title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं पराभव झाला. पाचवी म्हणजेच शेवटची टेस्ट भारत ११८ रननी हारला. पण या सीरिजमधल्या २ टेस्ट मॅच भारताला जिंकता आल्या असत्या. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी तर चौथ्या टेस्टमध्ये ६० रननी भारताचा पराभव झाला. या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारतीय बॅट्समननी निराशा केली नसती तर आज या सीरिजचा निकाल उलट असता.

या सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला असला तरी विराट कोहलीनं मात्र मागच्या इंग्लंड दौऱ्यातलं अपयश धुऊन काढलं आहे. ५ टेस्ट मॅचच्या १० इनिंगमध्ये विराटनं तब्बल ५९३ रन केले. यामध्ये २ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. पण विराट कोहली वगळता इतर भारतीय बॅट्समनना उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.

एकीकडे भारतीय बॅट्समनची कामगिरी खराब होत असतानाच भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्रीनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सध्याची भारतीय टीम मागच्या १५-२० वर्षांमधली परदेश दौरा करणारी सर्वोत्तम टीम असल्याचं शास्त्री म्हणाला होता. हे म्हणताना शास्त्रीनं अप्रत्यक्षरित्या सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली आणि सेहवाग यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंवर निशाणा साधला होता.

कोहली पत्रकारावर भडकला

रवी शास्त्रीच्या या वक्तव्याची भारतीय कर्णधार विराट कोहलीनं पाठराखण केली आहे. मागच्या भारतीय टीम १५-२० वर्षातली परदेश दौरा करणारी सर्वोत्तम टीम आहे हे शास्त्रीचं म्हणणं तुला पटतं का? असा सवाल विराटला विचारण्यात आला. तेव्हा, ''का नाही? आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला काय वाटतं?" असा प्रश्न विराटन पत्रकाराला विचारला. तेव्हा पत्रकारानं 'मी याबद्दल खात्रीनं सांगू शकत नाही' असं म्हणाला. हा तुमचा दृष्टीकोन आहे, धन्यवाद, असं भडकेलला विराट म्हणाला आणि यानंतर त्यानं पत्रकाराशी बोलणं टाळलं.