नेपियर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जवळपास प्रत्येक सामन्यामध्ये नवे विक्रम करताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांमध्येही विराटनं आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लाराला मागे टाकत विराट कोहली दिग्गजांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० खेळाडूंमध्ये विराट गेला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये विराटनं ४५ धावांची खेळी केली. यामुळे विराटच्या आता एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,४३० धावा झाल्या आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटनं लाराच्या १०,४०५ धावांचा विक्रम मोडीत काढला. एकदिवसीय सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता दहाव्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळा़डूंमध्ये विराट दहाव्या क्रमांकावर असला तरी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटनं आत्तापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३९ शतकं केली आहेत. या यादीमध्ये ४९ शतकांसह सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा दणदणीत विजयझाला. भारतानं १५६ धावांचं आव्हान ३४.५ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शिखर धवननं नाबाद ७५ धावांची खेळी केली. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं.
खरं तर डकवर्थ-लुईस हा नियम पाऊस आला तर वापरला जायचा, पण यावेळी पहिल्यांदाच जास्त सूर्यप्रकाश असल्यामुळे सामना थांबवण्यात आला. बॅटिंग करत असताना भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात सूर्यप्रकाश जात असल्यामुळे त्यांना बॉल दिसायला अडचण होत होती. त्यामुळे अंपायरनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या तासानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला आणि भारताला ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचं आव्हान मिळालं.
या सामन्यात न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण भारतीय बॉलरनी अचूक मारा करत न्यूझीलंडला सुरुवातीपासून धक्के दिले. त्यामुळे ३८ ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा संघ १५७ धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून कुलदीप यादवनं १० ओव्हरमध्ये ३९ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर मोहम्मद शमीला १९ रन देऊन ३ विकेट मिळाल्या. युझवेंद्र चहलला २ आणि केदार जाधवला १ विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं ८४ बॉलमध्ये ६४ धावांची खेळी केली.
सचिन तेंडुलकर- १८,४२६ धावा
कुमार संगकारा- १४,२३४ धावा
रिकी पॉण्टिंग- १३,७०४ धावा
सनथ जयसूर्या- १३,४३० धावा
महेला जयवर्धने- १२,६५० धावा
इंझमाम उल हक- ११,७३९ धावा
जॅक कॅलीस- ११,५७९ धावा
सौरव गांगुली- ११,३६३ धावा
राहुल द्रविड- १०,८८९ धावा
विराट कोहली- १०,४३० धावा