पाकिस्तानच्या सरफराज अहमदची जीभ घसरली, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णभेदी टिप्पणी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानचा ५ विकेटनं पराभव झाला.

Updated: Jan 23, 2019, 09:03 PM IST
पाकिस्तानच्या सरफराज अहमदची जीभ घसरली, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णभेदी टिप्पणी title=

डरबन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानचा ५ विकेटनं पराभव झाला. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेनं ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१नं बरोबरी साधली आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदनं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ऍन्डिले फेहलुक्वायोबद्दल सरफराज अहमदनं वर्णभेदी टिप्पणी केली आहे. सरफराजनं फक्त फेहलुक्वायोवर वर्णावरून टीका केली नाही, तर त्याच्या आईबद्दलही काही शब्द वापरले.  सरफराजचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं. या सगळ्या प्रकारानंतक सरफराज अहमदवर चौफेर टीका होत आहे. एवढच नाही तर सरफराजच्या निलंबनाचीही मागणी होत आहे.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमधल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०४ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानचा पाठलाग करत असताना फेहलुक्वायो बॅटिंग करत होता, तेव्हा सरफराजनं ही टिप्पणी केली.

सरफराजनं हे वक्तव्य केलं तेव्हा माईक हेजमन आणि रमीझ राजा कॉमेंट्री करत होते. माईक हेजमन यांनी सरफराज नक्की काय म्हणाला? याबद्दल रमीझ राजा यांच्याकडे विचारणा केली. पण रमीझ राजा यांनी हसत या प्रश्नाच उत्तर देणं टाळलं. सरफराज काय म्हणला त्याचं भाषांतर करणं कठीण आहे. हे मोठं आणि दीर्घ वक्तव्य आहे, असं उत्तर रमीझ राजा यांनी दिलं. या मॅचमध्ये फेहलुक्वायोनं ८० बॉलमध्ये नाबाद ६९ रनची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकवून दिल्यामुळे फेहलुक्वायोला सामनाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

सरफराजवर कारवाईची शक्यता

दरम्यान आयसीसीच्या वर्णभेदी टिप्पणी विरोधी नियमानुसार सरफराजवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या १ ऑक्टोबर २०१२ च्या नियमानुसार आयसीसी आणि त्यांचे सदस्य कोणाचाही त्याची जात, धर्म, संस्कृती, वर्ण, वंश, देश किंवा वंशीय मूळ यावरून अपमान करू शकत नाही. यामुळे आता अंपायर आणि मॅच रेफ्री सरफराजवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

शोएब अख्तरची सरफराजवर टीका

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं सरफराजवर टीका केली आहे. मी तो व्हिडिओ बघितला नाही, पण सरफराजच्या वक्तव्याचा मी पाकिस्तानी म्हणून निषेध करतो. त्याला असं करायला नको होतं. सरफराजनं याप्रकरणी माफी मागावी असं शोएब अख्तर म्हणाला.

सरफराजचं हे वक्तव्य लाजीरवाणं आहे. कोणाच्याही वर्णावर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. सरफराज अहमदमुळे पाकिस्तानमधल्या अनेक युवा खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरनं दिली. सरफराज पाकिस्तानमधल्या अनेक युवकांचा रोल मॉडल आहे. चांगल्या गोष्टी बोलून तुम्ही संघाचं नेतृत्व करायला हवं. त्यामुळे लवकरच सरफराज माफी मागेल, अशी अपेक्षा शोएबनं व्यक्त केली. शोएबनं सोशल नेटवर्किंगवर एक व्हिडिओ शेअर करून त्याचं हे मत मांडलं.