Virat Kohli lookalike on Bangladesh: बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार उफाळला असून घरं, कार्यालयं, संस्था जाळल्या जात आहेत. रस्त्यावर उतरुन नागरिकांकडून आंदोलन केलं जात आहे. दुसरीकडे हिंसाचार उफाळण्याआधीच शेख हसीना यांनी पंतप्रधानपदासह देशही सोडला आहे. सोमवारी बांगलादेशात लाखो आंदोलक रस्त्यावर उतरुन शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. दुपारपर्यंत शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडून फरार झाल्या.
बांगलादेशात सत्तांतर झालं असून, लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. एकीकडे आंदोलक आनंद साजरा करत असताना दुसरीकडे या घरांची जाळपोळ करत लुटलं जात आहे. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसल्यानंतर तर उद्रेक केला होता. त्यांनी साड्या, फर्निचर, मासे सगळं काही चोरुन नेलं. तसंच किचनमध्ये घुसून जेवणावर ताव मारत, बेडवर झोपून आरामही केला.
बांगलादेशची राजधानी ढाकामधील एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चक्क विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसणारा तरुण आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसत आहे. अनेकांना तर विराट कोहली बांगलादेशात खरंच पोहोचला की काय? असं वाटलं होतं. पण हा फक्त त्याच्यासारखा दिसणारा तरुण आहे.
व्हिडीओत दिसत आहे की, तरुणाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची टोपी घातली आहे. यावेळी काही लोकांनी त्याला खांद्यावर उचललं असून, तो नाचत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तो हुबेहुब विराट कोहलीसारखा दिसत असल्याची कमेंट केली आहे.
King Kohli joins the victory celebration at the streets of Chattogram, #Bangladesh pic.twitter.com/zxl5opkbEq
— Zeyy (@zeyroxxie) August 5, 2024
बांगलादेशातील राजकीय गोंधळानंतर आता अंतरिम सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. देशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली बंगा भवन (राष्ट्रपती भवन) येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांचा अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही सेना प्रमुखांनीही या बैठकीला हजेरी लावली.