मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा २२४ रननं शानदार विजय झाला. रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूनं केलेल्या शतकामुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. पण रायुडूच्या या खेळीमुळे भारतीय टीमचा मोठा प्रश्न सुटला आहे. २०१५ वर्ल्ड कपनंतर भारतीय टीमनी ४ क्रमांकावर अनेक बॅट्समनना खेळवलं. पण यातल्या एकाही बॅट्समनला यशस्वी कामगिरी करता आली नाही. अखेर अंबाती रायुडूनं त्याला मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. त्यामुळे २०१९ वर्ल्ड कपसाठी चौथ्या क्रमांकावर रायुडूचं स्थान निश्चित झालं आहे, असं वक्तव्य भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं केलं आहे.
रायुडूनं त्याला मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला. २०१९ वर्ल्ड कपपर्यंत तो टीममध्ये असणं गरजेचं आहे. तो बुद्धीमान आहे आणि त्याला खेळ समजतो, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.
चौथ्या वनडेमध्ये रायुडूनं ८१ बॉलमध्ये १०० रनची खेळी केली. यानंतर रोहित शर्मानंही त्याचं कौतुक केलं. वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर अखेर आम्हाला सापडलं आहे, असं रोहित म्हणाला. वर्ल्ड कपसाठी आणखी बराच वेळ आहे. त्यामुळे आत्ता कोणाचीच जागा टीममध्ये निश्चित नाही. पण रायुडू चांगंल प्रदर्शन करेल अशी आशा आहे. आता आम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये खेळणार आहोत. यानंतर इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप होईल. बॉल स्विंग होत असेल तर रायुडू प्रभावी ठरेल, असा विश्वास रोहितनं व्यक्त केला.