'त्या' Insta स्टोरीमुळे विराटने आवडत्या गायकाला केलं Unfollow; भाजपाकडून FIR ची मागणी

Virat Kohli Unfollows Favourite Singer BJP Jumps in Controversy: विराट कोहलीने पूर्वी अगदी पोस्ट करत या गायकाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. मात्र आता विराटने त्याला अनफॉलो केलं आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 19, 2023, 09:11 AM IST
'त्या' Insta स्टोरीमुळे विराटने आवडत्या गायकाला केलं Unfollow; भाजपाकडून FIR ची मागणी title=
विराटने या गायकाला केलं अनफॉलो

Virat Kohli Unfollows Favourite Singer BJP Jumps in Controversy: भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या शुभ या गायकाला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचं वृत्त आहे. या पंजाबी गायकाने खलिस्तान्यांचं समर्थन करणारा भारताचा वादग्रस्त नकाशा इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता. त्यानंतरच कोहलीने लगेच त्याला अनफॉलो केलं. भारताविरुद्ध कुरापती करणाऱ्या खलिस्तानी गटाला हा पंजाबी गायक समर्थन करत असल्याचं पाहून अनेक भारतीयांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी आपला संतापही व्यक्त केला आहे.

एकेकाळी विराटनेच केलेलं कौतुक

काही काळापूर्वीच शुभचं कौतुक विराट कोहलीने केलं होतं. 26 वर्षीय गायकाचं गाणं ऐकून आपण आश्चर्यचकित झालो आहोत असं विराटने म्हटलं होतं. "सध्या माझा सर्वात आवडता गायक आहे शुभम. तो गाण्यांसाठी जे काही करतो ते त्याचं प्रेम आहे. ऐकून मंत्रमुग्ध झालो," असं विराटने ट्वीट केलं होतं. त्यावर शुभमने रिप्लाय करताना कोहलीचे आभार मानले होते. 

काय आहे नकाशामध्ये?

मात्र आता शुभमने खलिस्तांन्यांना समर्थन करणारा भारताचा नकाशा इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केला होता. या नकाशामध्ये पंजाब प्रांताचा भाग भारताच्या नकाशात दाखवण्यात आलेला नाही. ही स्टोरी शेअर करताना शुभने पंजाबसाठी प्रार्थना करा अशी ओळ लिहून नमस्कार करत असल्याचे इमोजी वापरले होते.  याचनंतर विराटने शुभला अनफॉलो केलं आहे. या माध्यमातून देशाच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांना आपण दया माया दाखवत नाही, असाच संदेश कोहलीने दिला आहे.

भाजपाचाही विरोध

शुभच्या मुंबईत कार्यक्रमाचा भारतीय जनता पार्टीने विरोध केला आहे. मुंबईमध्ये शुभमच्या कार्यक्रमाचे पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर्स काढून टाकण्यात आले आहेत. आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी भारतीय युवा मोर्चाने केली आहे. खलिस्तानी समर्थकांना मुंबईत कार्यक्रम करुन देणार नाही, असं भाजपाने म्हटलं आहे. 

कारवाईचा इशारा

भाजपा युवा मोर्चेचा मुंबईचे अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाणा यांनी शुभमचा कार्यक्रम रद्द करावा अशीही मागणी केली आहे. भारताचे सर्वभौमत्व आणि एकतेला विरोध करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर कार्यक्रम करण्याचा काहीही अधिकार नाही. या देशात खलिस्तान समर्थकांसाठी जागा नाही. हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. आम्ही आयोजाकांना कारवाईचा इशाराही दिला आहे.

एफआयआर दाखल करण्याची मागणी

तजिंदर सिंह तिवाणा यांनी पोलिसांकडे शुभविरोधात तक्रार दाखल केली आहे. शुभने शेअर केलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीरबरोबरच ईशान्य भारतही दाखवण्यात आलेला नव्हता. शुभविरोधात एफआयआर दाखल करावी अशी मागणी तजिंदर सिंह तिवाणा यांनी केली आहे.