मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारतात बनलेल्या एसजी बॉलऐवजी दुसऱ्या बॉलनं टेस्ट क्रिकेट खेळण्यात यावं, अशी मागणी विराटनं केली आहे. जगभरात इंग्लंडमध्ये बनलेल्या ड्यूक बॉलनं टेस्ट क्रिकेट खेळावं, असं विराट म्हणाला. विराटनं भारतात वापरण्यात येणाऱ्या एसजी बॉलच्या खराब गुणवत्तेवरही आक्षेप घेतले. भारतात होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी एसजी बॉलचा वापर करण्यात येतो.
ड्यूक बॉल हा टेस्ट क्रिकेटसाठी सर्वोत्तम आहे, असं विराटला वाटतंय. जगभरात ड्यूक बॉलचा वापर करावा, अशी शिफारस मी करीन, असं वक्तव्य विराटनं केलं. बॉलच्या वापराबाबत आयसीसीनं कोणतेही खास दिशानिर्देश दिलेले नाहीत. प्रत्येक देशाला वेगवेगळा बॉल वापरण्याची परवानगी आहे.
कोहलीआधी आर. अश्विननंही भारतात एसजी बॉलऐवजी कुकाबुरा बॉल वापरण्यात यावा, अशी मागणी केली होती. अश्विनच्या या मागणीचं कोहलीनं समर्थन केलं. पाच ओव्हरमध्ये बॉल घासला जातो. असं आम्ही याआधी कधीच बघितलं नव्हतं. आधी वापरण्यात येणाऱ्या बॉलची गुणवत्ता चांगली होती पण आता यामध्ये काय कमी आलीये ते मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.
ड्यूक बॉल हा सर्वोत्तम गुणवत्ता असलेला आहे. कुकाबुराचा बॉलही चांगला असतो. कुकाबुरानं त्यांच्या बॉलच्या गुणवत्तेची कधीच समझोता केला नाही, असं विराट म्हणाला.
भारतामध्ये टेस्ट क्रिकेटसाठी स्वदेशी एसजी बॉलचा वापर होतो. तर इंग्लंड, वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक आणि ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाव्बे आणि श्रीलंकेमध्ये कुकाबुरा बॉलचा वापर होतो.
कुकाबुरा, एसजी आणि ड्यूक बॉलमध्ये सीमचा फरक असतो. कुकाबुरा बॉलची सीम आतल्या बाजूला असते. यामुळे हा बॉल सुरुवातीच्या २० ओव्हरमध्ये स्विंग होतो. पण २० ओव्हरनंतर सीम गेल्यावर बॅट्समनना खेळणं सोपं होतं. पण कुकाबुरा बॉलची सीम गेल्यानंतर स्पिनरना बॉल पकडणं कठीण होतं.
ड्यूक बॉलची सीम नीट ठेवली तर ५० ते ५५ ओव्हरपर्यंत शाबूत राहते. यामुळे ड्यूक बॉल जास्त ओव्हरपर्यंत स्विंग होऊ शकतो. ड्यूक बॉल हा बॉलरना सर्वाधिक मदत करणारा बॉल म्हणून ओळखला जातो.
एसजी बॉलची सीम ही वरच्या बाजूला असते. पण एसजी बॉल फक्त १० ओव्हरपर्यंत स्विंग होतो. एसजी बॉलची चमकही लवकर फिकी पडते. पण सीम ८०-९० ओव्हरपर्यंत अखंड राहते. यामुळे ४०-५० ओव्हरनंतर एसजी बॉल रिव्हर्स स्विंग होतो. तसंच बॉलची सीम वरच्या बाजुला असल्यामुळे स्पिनरनाही बॉल पकडणं आणि बॉल स्पिन करणं सोपं जातं.
कुकाबुरा बॉल हा एसजी बॉलच्या कित्येक पट महाग असतो. एसजी बॉल कुकाबुरा बॉलपेक्षा १/७ कमी किंमतीला मिळतो.