कर्णधारपद काढून घेतल्याने विराट कोहली नाराज?

बीसीसीआयने एकदिवसीय टीमचं कर्णधारपदंही रोहित शर्माकडे दिलं असून आता भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचं दिसत आहे

Updated: Dec 13, 2021, 01:08 PM IST
कर्णधारपद काढून घेतल्याने विराट कोहली नाराज? title=

मुंबई : विराट कोहली आता भारतीय एकदिवसीय टीमचा कर्णधार नाही. टी-20 नंतर बीसीसीआयने एकदिवसीय टीमचं कर्णधारपदंही रोहित शर्माकडे दिलं असून आता भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचं दिसत आहे. कदाचित याच कारणामुळे तो अद्याप मुंबईतील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये सामील झालेला नाही. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला रविवारी मुंबईत एकत्र येण्यास सांगण्यात आलं होतं. पण भारतीय कसोटी कर्णधार कोहली शिबिराच्या पहिल्या दिवशी संघात सामील झाला नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणारे भारतीय खेळाडू मुंबईत पोहोचले आहेत. मात्र अजूनही सर्वजण कोहलीची वाट पाहतायत. सोमवारी सर्वांना 3 दिवस क्वारंटाईन केलं जाईल आणि त्यानंतर ते 16 डिसेंबरला जोहान्सबर्गला रवाना होतील. 

इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, विराटला स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती, परंतु तो कॅम्पमध्ये सहभागी झालेला नाही. आम्ही आशा करतो की तो आज सामील होईल.

कोहली अधिकाऱ्यांशी बोलला नाही!

निवड समिती आणि बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी विराट कोहलीला फोन केला होता. यावेळी त्याने फोन उचलला नसून पुन्हा फोनही केला नसल्याची माहिती आहे. याआधी बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी कोहलीचा फोन बंद असल्याचं सांगितलं होतं.

एकदिवसीय संघाचा कर्णधार झाल्याबद्दल कोहलीने रोहितचे अभिनंदनही केलं नाही याकडेही चाहत्यांचं लक्ष गेलं. मात्र, त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर युवराज सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.