टी-20नंतर विराटचं वनडेमधील कर्णधारपदंही धोक्यात?

बीसीसीआय विराट कोहलीच्या वनडे कर्णधारपदाच्या भविष्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते.

Updated: Nov 10, 2021, 08:21 AM IST
टी-20नंतर विराटचं वनडेमधील कर्णधारपदंही धोक्यात? title=

मुंबई : टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील गट सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला T20 चा नवा कर्णधार बनवण्यात आलंय. टी-20 वर्ल्डनंतर विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमधील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडलं.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय विराट कोहलीच्या वनडे कर्णधारपदाच्या भविष्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते. 2023 मध्ये होणाऱ्या 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआयला टी-20 आणि एकदिवसीय फॉर्मेटसाठी एकच कर्णधार हवा असल्याचं समजतं. अशा स्थितीत कोहलीच्या वनडे कर्णधारपदाच्या भवितव्याबाबत आगामी काळात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, “मला खात्री नाही की बीसीसीआय विराटला वनडे कर्णधार म्हणून कायम ठेवणार नाही. याची शक्यता फारच कमी असल्याची चर्चा आहे. तो यापुढे कसोटी कर्णधार असेल. फक्त एक कर्णधार हवा आहे आणि योग्य वेळ आल्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेबाबत निर्णय घेतला जाईल."

रोहित शर्माची T20 कर्णधार म्हणून नियुक्ती ही केवळ औपचारिकता होती, तर लोकेश राहुल उपकर्णधार असेल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा रोहित शर्मा उपलब्ध असेल, तेव्हा दुसरा पर्याय नाही. तसंच लोकेश राहुल उपस्थित आहे, पण सध्या उपकर्णधारपदासाठी त्याच्या नावाचा विचार केला जाईल. अर्थात रोहित जेव्हा ब्रेक घेतो तेव्हा राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करेल."

17 नोव्हेंबरपासून टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच घरी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहलीशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड आणि सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू हर्षल पटेल यांचाही भारताच्या 16 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.