IPL 2021: धोनीची CSK यावेळीही चॅम्पियन होणार नाही, वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी

आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन संघांच्या नावांचंही भाकित सेहवागने वर्तवलं आहे

Updated: Sep 20, 2021, 05:59 PM IST
IPL 2021: धोनीची CSK यावेळीही चॅम्पियन होणार नाही, वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा कालपासून यूएईमध्ये सुरु झाला. कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली होती. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा स्पर्धा दोन टप्प्यांत खेळली जात आहे. पहिल्या टप्प्यात 29 सामने खेळवले गेले होते. आता दुसऱ्या टप्प्यात 31 सामने होणार आहेत.

सेहवागने केली भविष्यवाणी

जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगचा दुसरा टप्पा सुरू झाला असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) चॅम्पियन संघाबद्दल भाकीत वर्तवलं आहे. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings) यावेळीही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकणार नाही अशी भविष्यवाणी सेहवागने केली आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2021 च्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

'या दोन संघात होईल फायनल'

इतकंच नाही तर आयपीएलच्या फायनलमध्ये खेळणाऱ्या दोन संघांच्या नावाचंही भाकित सेहवागने वर्तवलं आहे. सेहवागच्या मते दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन संघात आयपीएलची फायनल खेळली जाईल. यातही मुंबई इंडियन्सचं पारडं जड असेल असं सेहवागला वाटतंय.

युएईमधील (UAE) खेळपट्ट्या चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांना अनुकुल नसल्याचं सेहवागचं म्हणणं आहे. चेन्नई सुपर किंग्सला आपला जुना फॉर्म मिळवण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे. 

पॉईंट टेबलमध्ये सीएसके टॉपवर

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. आणि पॉईंट टेबलमध्ये सध्या टॉपवर आहेत.  दिल्ली कॅपिटल्सनेही 8 सामन्यात 6 विजय मिळवले असून दुसऱ्या स्थान पटकावलं आहे. विराट कोहलीची (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore) तिसऱ्या स्थानावर असून 7 सामन्यांत त्यांनी पाच सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात सीएसकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्स सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात 4 विजयांसह 8 गुण जमा आहेत.
---