मुंबई : ब्रिस्टलमध्ये झालेल्या वादानंतर इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं सहा महिन्यांनंतर पुनरागमन केलं. न्यूझिलंडविरुद्धच्या मॅचमध्ये स्टोक्सनं 63 रन्सची नाबाद खेळी केली. पाच वनडे मॅचच्या या सीरिजच्या दुसऱ्या मॅचमध्ये स्टोक्सच्या खेळीमुळे इंग्लंडचा सहा विकेट्सनं विजय झाला. याविजयाबरोबरच सीरिज आता 1-1नं बरोबरीमध्ये आहे.
पुनरागमन केल्यानंतर दुसरी मॅच खेळणाऱ्या स्टोक्सनं बॅटनंच नाही तर बॉलनंही शानदार कामगिरी केली. स्टोक्सनं न्यूझीलंडच्या 2 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
या मॅचमध्ये न्यूझीलंडनं पहिले बॅटिंग करून इंग्लंडपुढे 224 रन्सचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या पहिल्या 3 विकेट 86 रन्सवर गेल्या. यानंतर स्टोक्सनं इंग्लंडला सावरलं. स्टोक्सनं मॉर्गनसोबत 88 रन्सची आणि जॉश बटलरसोबत 51 रन्सची पार्टनरशीप केली. मॅच जिंकल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना मी भावूक झालो होतो, असं स्टोक्स म्हणाला.
ब्रिस्टलच्या नाईट क्लबमध्ये झालेल्या हाणामारीनंतर स्टोक्स 6 महिने क्रिकेटपासून लांब होता. या वादानंतर स्टोक्सवर आरोप निश्चित झाले आहेत आणि प्रकरण न्यायालयामध्ये आहे. या महिन्यामध्ये पुन्हा स्टोक्सला न्यायालयासमोर हजर राहावं लागणार आहे. ईसीबीनं चौकशी पूर्ण होईपर्यंत स्टोक्सला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता.