T20 World Cup 2024: अमेरिका देखील क्रिकेट खेळते हा प्रश्न अजूनही आपल्यापैकी अनेकांना पडतो. यंदाचा आयीसीसी टी-20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप 2 जूनपासून सुरु होणार असून यामध्ये तब्बल 20 टीम्स सहभागी होणार आहेत. गेल्या 3 वर्षांमध्ये अमेरिकेत जागतिक दर्जाची मैदाने बांधण्यात आली आहेत. अमेरिकेत क्रिकेट फारसे प्रसिद्ध नाहीये, मात्र तरीही आयसीसीने याठिकाणी वर्ल्डकपसाठी मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित होतोय.
यूएसएमध्ये क्रिकेट चाहत्यांची संख्या काही प्रमाणात कमी आहे. अशा परिस्थितीत मैदानात जागा भरणं हे मॅनेजमेंटसाठी खूप अवघड काम असण्याची शक्यता आहे. याच गोष्टीचा विचार करता या वर्ल्डकपमधील केवळ 16 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेत एकूण 20 टीम्स आहेत, ज्यामध्ये अंतिम फेरीपर्यंत 55 सामने खेळवले जाणार आहे. यातील 16 सामने यूएसएमध्ये आणि उर्वरित 39 सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अशी घोषणा करण्यात आली होती की, 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा पुन्हा समावेश केला जात आहे. मात्र 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या कमबॅकचा यूएसएमध्ये 2024 च्या T-20 वर्ल्डकपच्या आयोजनाशी काय संबंध? तर 2028 ऑलिम्पिक खेळ अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणार आहेत. तोपर्यंत आयसीसी अमेरिकेत क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
क्रिकेटचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला आणि त्यानंतर ब्रिटीशांचे राज्य असलेल्या सर्व देशांमध्येही क्रिकेट हा खेळ लोकप्रिय झाला. आजच्या घडीला क्रिकेट हे आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातही खूप लोकप्रिय झालेलं दिसून येतं. पण पाश्चिमात्य देशांमध्ये किक्रेटला म्हणावी तशी लोकप्रियता मिळालेली दिसून येत नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेचा वापर क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी केला जाऊ शकतो. जर क्रिकेट अमेरिकेत प्रवेश करण्यात यशस्वी झाला, तर मेक्सिको, ब्राझील आणि अर्जेंटिनासारख्या देशांनाही क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल.
2024 च्या T-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 9 मैदाने निवडण्यात आली आहेत, त्यापैकी 6 कॅरिबियन बेटांवर आहेत. यामध्ये उर्वरित तीन स्टेडियम हे अमेरिकेत होणार मध्ये आहेत. नासाऊ काउंटी स्टेडियम (न्यू यॉर्क), सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क (फ्लोरिडा) आणि ग्रँड प्रेरी स्टेडियम (टेक्सास) या 3 अमेरिकेतील मैदानांवर वर्ल्डकपचे सामने रंगणार आहेत.