'मी उडी का मारली नाही?', धोनीला अजूनही वर्ल्ड कप पराभवाची खंत

२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला.

Updated: Jan 13, 2020, 08:23 AM IST
'मी उडी का मारली नाही?', धोनीला अजूनही वर्ल्ड कप पराभवाची खंत

मुंबई : २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला. याचबरोबर भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. एमएस धोनी रनआऊट झाल्यानंतर भारताच्या फायनल गाठायच्या आशा संपुष्टात आल्या. धोनीने अखेर त्याच्या या रनआऊटवर भाष्य केलं आहे.

'माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही मी रनआऊट झालो आणि वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही रनआऊटच झालो. मी उडी का मारली नाही? हा प्रश्न मी स्वत:ला अजूनही विचारतो. शेवटी फक्त २ इंचाचा फरक पडला. मी उडी मारायला पाहिजे होती, हे मी स्वत:लाच सांगतो', असं धोनी म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचा १८ रननी पराभव झाला होता. सुरुवातीच्या विकेट झटपट गेल्यानंतर धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यात ११६ रनची पार्टनरशीप झाली. जडेजाने ७७ रन आणि धोनीने ५० रनची खेळी केली.

शेवटच्या २ ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी ३१ रनची गरज होती. धोनीने ४९व्या ओव्हरच्या सुरुवातीलाच लॉकी फर्ग्युसनला सिक्स मारली आणि आपलं अर्धशतकं पूर्ण केलं. यानंतर पुढच्या बॉलला एकही रन न आल्यामुळे धोनीवर दबाव आला. यानंतर २ रन काढून स्ट्राईक घेण्याचा धोनीने प्रयत्न केला, पण मार्टिन गप्टीला थ्रो स्टम्पला लागला आणि धोनी माघारी परतला.

धोनी पॅव्हेलियनमध्ये परत जात असतानाच, कोट्यवधी भारतीयांचं स्वप्नही तुटलं. धोनीची विकेट गेल्यानंतर भारताने युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारला ५ रनच्या अंतरामध्ये गमावलं. २२१ रनवर भारताचा ऑल आऊट झाला.