"IPL जिंकणं वर्ल्डकप जिंकण्यापेक्षा कठीण, कारण..."; रोहितची पाठराखण करताना गांगुलीचा अजब युक्तिवाद

Winning IPL Is Tougher Than Winning A World Cup: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पराभूत झाल्यापासून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मावर टीकेची झोड उठत असतानाच बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी रोहितची पाठराखण केल्याचं पहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 14, 2023, 12:45 PM IST
"IPL जिंकणं वर्ल्डकप जिंकण्यापेक्षा कठीण, कारण..."; रोहितची पाठराखण करताना गांगुलीचा अजब युक्तिवाद title=
सौरव गांगुलीने रोहितची कर्णधार म्हणून निवड योग्य असल्याचंही म्हटलं (फोटो- बीसीसीआय, आयपीएल)

Sourav Ganguly Strongly Defends Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC 2023) भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघावर आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 2021 मध्ये सौरव गांगुलीच्या कार्यकाळात बीसीसीआयने म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित संघाच्या खांद्यावर दिली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली तरी 2013 पासूनचा आयसीसी चषक जिंकण्याचा दुष्काळ संपेल अशी अपेक्षा बीसीसीआयलाही होती. मात्र त्यासंदर्भात फारसं काही घडल्याचं चित्र दिसत नाही. 2022 चा टी-20 वर्ल्डकप असो किंवा 2023 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असो भारताच्या पदरी अपयशच आलं आहे.

रोहित ठरतोय टिकेचा धनी

भारताचा 209 धावांनी पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर पुन्हा टिका होताना दिसत आहे. रोहितने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय असो किंवा जगातील या घडीचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असलेल्या अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याच्या निर्णयावरुनही त्याला लक्ष्य करण्यात आलं. भारताच्या पराभवानंतर अनेकांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आठवला तर काहींनी रोहितवर तिरकस शब्दांमध्ये टीका करत त्याला फक्त आयपीएलचे चषक जिंकता येतात असा टोला लगावला. 

...म्हणून रोहितची कर्णधारपदी निवड केली

एकीकडे अगदी आयपीएलपासून ते नाणेफेक जिंकल्यानंतरच्या निर्णयापर्यंत रोहितवर टीका होत असतानाच दुसरीकडे बीसीसीआयचा माजी अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मात्र रोहित शर्माची पाठराखण केली आहे. रोहित शर्माची कर्णधार म्हणून नियुक्ती अगदी योग्य असल्याचं मत सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे. विराट कोहलीनंतर रोहित शर्माच उत्तम पर्याय होता. रोहितचा विचार करताना त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने 5 वेळा आयपीएल चषक जिंकला होता ही गोष्ट फार महत्त्वाची ठरल्याचंही सौरव म्हणाला. "निवड समितीला विराटनंतर कर्णधार शोधायचा होता आणि त्यावेळी रोहितच सर्वोत्तम पर्याय होता. त्याने आयपीएलच्या 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्तम खेळत होता. त्याने आशिया चषक जिंकून दिलेला. त्यामुळेच तो सर्वोत्तम पर्याय होता. जरी आपण पराभूत झालो असलो तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळला हे लक्षात घ्यायला हवं," असं गांगुलीने 'आज तक'शी बोलताना सांगितलं. 

रोहितची पाठराखण

"2 वर्षांपूर्वीही आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पराभूत झालो होतो. आपण टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीपर्यंत पोहोचलेलो. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी कोण करु शकतो त्याची निवड केली जाते," असं रोहितच्या निवडीसंदर्भात बोलताना गांगुलीने सांगितलं. पुढे बोलताना गांगुलीने रोहित शर्माची पाठराखण केली. आयपीएलचा चषक जिंकणं हे विश्वचषक जिंकण्यापेक्षा कठीण असल्याचं मत गांगुलीने रोहितची पाठराखण करताना व्यक्त केलं. केवळ रोहित आणि धोनी या दोघांनाच पाच वेळा आयपीएल चषक जिंकता आला आहे.

...म्हणून वर्ल्डकप जिंकणं आयपीएल जिंकण्यापेक्षा सोप

"मला रोहितवर पूर्ण विश्वास आहे. त्याने आणि धोनीनेच 5 आयपीएल चषक जिंकले आहेत. आयपीएल चषक जिंकणं सोप नाही कारण ही फार कठीण स्पर्धा आहे. विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिंकणं अधिक कठीण आहे, कारण सलग 14 सामने खेळल्यानंतर संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचतो. वर्ल्डकपमध्ये 4 ते 5 सामन्यांमध्ये सेमीफायनलसाठी स्थान निश्चित करता येतं. आयपीएलमध्ये चषक जिंकण्यासाठी तुम्हाला 17 सामने जिंकावे लागतात," असं सौरव म्हणाला.  

गांगुलीवर टीका

सौरव गांगुलीच्या या विधानावरुन अनेकांनी त्याच्यावर टिकेची झोड उठवली आहे. सौरव गांगुलचं विधान हे तर्कविसंगत आहे, आयपीएल आणि देशासाठी खेळण्यासंदर्भात विचार करताना देशाला प्राधान्य द्यायला हवं असं मत चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.