Women's T20 Challenge 2020 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी महिला टी-20 चॅलेंज 2020 चे प्रायोजक म्हणून जिओची घोषणा केली आहे. बीसीसीआय आणि जिओ यांच्यातील भागीदारी रिलायन्स फाउंडेशन एज्युकेशन स्पोर्ट्स फॉर ऑलला देखील सहाय्य करेल. प्रायोजकांनी बीसीसीआयबरोबर विशेषत: महिलांच्या सामन्यांसाठी करार केल्याची ही पहिलीच वेळ आहे. 4 नोव्हेंबरपासून शारजाह येथे स्पर्धा सुरू होईल. अंतिम सामना 9 नोव्हेंबरला होणार आहे.
या भागीदारीबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, "बीसीसीआयने सर्व प्रकारात क्रिकेट हा खेळ वाढवला आहे, त्यामुळे महिलांच्या खेळाकडे फोकस वाढवण्यासाठी देखील हे महत्वपूर्ण क्षेत्र आहे. आम्हाला आशा आहे की जिओ महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा अनेक तरुण मुलींना खेळायला प्रेरणा देईल. तसेच पालकांना हे पटवून देईल की क्रिकेट ही त्यांच्या मुलींसाठी करिअरची उत्तम संधी आहे.'
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमधील भारतातील पहिली महिला आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा निता अंबानी म्हणाल्या की, "महिला टी-२० चॅलेंज आयोजित करण्यासाठी बीसीसीआयचे मनापासून अभिनंदन. हे महिला क्रिकेटच्या विकासाच्या दृष्टीने प्रगतीशील पाऊल आहे." या उपक्रमासाठी मी सहकार्य केल्याबद्दल मला आनंद होत आहे.'