close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा

३० मेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे.

Updated: Apr 17, 2019, 06:27 PM IST
World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा

मुंबई : ३० मेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. आश्चर्यकारकरित्या इंग्लंडच्या टीममध्ये जोफ्रा आर्चरची निवड करण्यात आलेली नाही. पण आर्चर आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करून वर्ल्ड कप टीममध्ये समाविष्ट होऊ शकतो, असं इंग्लंड टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष एड स्मिथ म्हणाले. जो डेनली आणि टॉम कुरन यांची वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या १५ खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली आहे.

बारबाडोसमध्ये जन्मलेल्या जोफ्रा आर्चरने मागच्या मोसमात इंग्लिश काऊंटी ससेक्सकडून खेळताना आणि ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या नव्या निवासी नियमांनुसार आता जोफ्रा आर्चर टीममध्ये निवड होण्यासाठी पात्र होऊ शकतो.

आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये जोफ्रा आर्चरची निवड करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली तर आर्चरची वर्ल्ड कप टीममध्ये निवड होईल. २३ मेपर्यंत टीममध्ये बदल करण्याची मुभा आयसीसीने दिलेली आहे. पण २३ एप्रिलपर्यंत प्रत्येक क्रिकेट बोर्डाला त्यांची टीम घोषित करावी लागणार आहे. 'त्या हिशोबानेच आम्ही वर्ल्ड कपसाठीची प्राथमिक टीम घोषित केली आहे,' असं वक्तव्य एड स्मिथ यांनी केलं. ३० मे रोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

जोफ्रा आर्चर हा सध्या आयपीएलमध्ये राजस्थानच्या टीमकडून खेळत आहे. 'जोफ्रा आर्चरच्या स्थानिक आणि फ्रॅन्चायजी क्रिकेटमधल्या कामगिरीमुळे आम्ही खुश आहोत. आर्चर हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे,' अशी प्रतिक्रिया एड स्मिथ यांनी दिली.

इंग्लंड आयर्लंडविरुद्ध एक वनडे आणि पाकिस्तानविरुद्ध ५ वनडे मॅच आणि एक टी-२० मॅचची सीरिज खेळेल. इंग्लंड आणि आयर्लंडमधली वनडे ३ मे रोजी होईल. तर पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजला ५ मेपासून सुरुवात होईल.

वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांमध्ये इंग्लंडचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी २५ मे रोजी आणि अफगाणिस्तानशी २७ मे रोजी होणार आहे. ३० मेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपची फायनल १४ जुलैला खेळवली जाणार आहे.

वर्ल्ड कपसाठी इंग्लंडची प्राथमिक टीम

इओन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम कुरन, जो डेनली, एलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, क्रिस वोक्स, मार्क वूड

पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंडची टीम

इओन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम कुरन, जो डेनली, क्रिस जॉर्डन, ऍलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, क्रिस वोक्स, मार्क वूड

आयर्लंडविरुद्धची वनडे पाकिस्तानविरुद्धच्या टी-२०

इओन मॉर्गन (कर्णधार), जोफ्रा आर्चर, सॅम बिलिंग्स, टॉम कुरन, जो डेनली, क्रिस जॉर्डन, एलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, जेम्स विन्स, डेव्हिड विली, मार्क वूड