मॅनचेस्टर : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला, यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ रननी पराभव केला. वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी टीम इंडिया अजूनही मॅनचेस्टरमध्येच आहे.
टीम इंडिया रविवार म्हणजेच १४ जुलैपर्यंत मँचेस्टरमध्येच थांबणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टीम इंडियाच्या परतीच्या प्रवासाची तिकीटे आरक्षित केली गेली आहेत. काही खेळाडू १४ जुलैपर्यंत मॅनचेस्टरमध्येच थांबून त्यानंतर निघणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर लगेचच टीमची घरवापसीची तिकीटं काढण्यात आली होती.
रविवारी १४ जूलैला वर्ल्ड कपची फायनल मॅच खेळली जाणार आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना रंगणार आहे. यंदाच्यावेळी क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे. कारण या दोन्ही टीमना अजून एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
दरम्यान टीम इंडिया वर्ल्डकपनंतर वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ३ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. टी-२० आणि वनडे सीरिजसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांतीची शक्यता आहे.