World Cup 2019: केदार जाधवचा पर्याय म्हणून या ५ खेळाडूंची चर्चा

५० ओव्हरचा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता अवघे काही दिवस राहिले आहेत.

Updated: May 6, 2019, 05:08 PM IST
World Cup 2019: केदार जाधवचा पर्याय म्हणून या ५ खेळाडूंची चर्चा title=

मुंबई : ५० ओव्हरचा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. पण या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध खेळताना चेन्नईचा खेळाडू केदार जाधवच्या खांद्याला दुखापत झाली आहे. केदार जाधवची वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. पण अजूनही केदार जाधवची दुखापत किती गंभीर आहे, याबद्दल बीसीसीआयकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता केदार जाधव आयपीएलच्या प्ले-ऑफमधल्या मॅचमध्ये खेळणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. पण जर केदार जाधव वर्ल्ड कपला मुकला तर केदारचा बदली खेळाडू म्हणून ५ जणांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

अंबाती रायुडू

१५ एप्रिलला बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठीच्या १५ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. या यादीत मागच्या दीड ते दोन वर्षांपासून भारतीय टीममध्ये असलेल्या अंबाती रायुडूला डच्चू देण्यात आला होता. रायुडू दीड ते दोन वर्ष चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करत होता. पण अचानक फॉर्म ढासळल्यामुळे रायुडूला वर्ल्ड कपमधून वगळण्यात आलं. रायुडूच्या या खराब फॉर्ममुळे भारताची वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची समस्याही वाढली. पण आता केदार जाधवला संधी मिळत नसेल तर पुन्हा एकदा रायुडूला संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये मात्र रायु़डूची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

ऋषभ पंत

भारतीय टीममध्ये निवड न झालेलं दुसर नावं म्हणजे ऋषभ पंत. पंतची निवड न झाल्यामुळे अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं. दुसरा विकेट कीपर म्हणून आमच्याकडे पंत आणि कार्तिक यांचा पर्याय होता, पण धोनीला दुखापत झाली तरच दुसऱ्या विकेट कीपरला संधी मिळेल. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये तणाव झेलू शकणारा खेळाडू आणि कीपिंगमध्ये कार्तिक पंतपेक्षा उजवा असल्यामुळे कार्तिकची निवड झाली, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले होते.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंतने शतकं झळकावली होती. पण वनडे आणि टी-२० मध्ये पंत बेजबाबदार शॉट मारून आऊट झाला होता. आयपीएलमध्ये मात्र दिल्लीकडून खेळताना पंतने शानदार कामगिरी केली आहे. केदार जाधव जर उपलब्ध नसेल तर ऋषभ पंतचा निवड समिती विचार करू शकते.

श्रेयस अय्यर

इंडिया ए कडून खेळताना कर्णधार आणि बॅट्समन म्हणून श्रेयस अय्यर नेहमीच प्रभाव पाडतो. आयपीएलमध्येही श्रेयस अय्यर दिल्लीचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात दिल्लीने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे. श्रेयस अय्यरचं स्थानिक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं रेकॉर्ड बघता तो केदारला एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मनिष पांडे

यंदाच्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मनिष पांडे फॉर्ममध्ये आला आहे. याचबरोबर इंडिया ए साठीही मनिष पांडेची कामगिरी चांगली झाली आहे. याआधी चौथ्या क्रमांकाचा पर्याय म्हणून मनिष पांडेलाही संधी देण्यात आली होती. फिल्डिंगमध्येही मनिष पांडे सरस आहे.

शुभमन गिल

अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला विजय मिळवून देण्यात शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गिल हा अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळतानाही गिलने स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं. शुभमन गिलकडे जलद खेळी करण्याचीही क्षमता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये गिलला संधी देण्यात आली होती. या मॅचमध्ये त्याने ९ रन केल्या होत्या, पण या मॅचमध्ये बहुतेक भारतीय बॅट्समनना ५ पेक्षा जास्त रन करता आल्या नव्हत्या. शुभमन गिल हा तंत्रशुद्ध बॅट्समन आहे, तसंच त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं मत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी मांडलं आहे.