close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : धोनीवरच्या टीकेनंतर सचिन सोशल मीडियावर ट्रोलचा शिकार

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करणारा सचिन तेंडुलकर ट्रोल आर्मीचा शिकार झाला आहे

Updated: Jun 25, 2019, 10:35 PM IST
World Cup 2019 : धोनीवरच्या टीकेनंतर सचिन सोशल मीडियावर ट्रोलचा शिकार

बर्मिंघम : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करणारा सचिन तेंडुलकर ट्रोल आर्मीचा शिकार झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये एमएस धोनीने केलेल्या संथ बॅटिंगवर सचिनने टीका केली होती. या मॅचमध्ये धोनीने ५२ बॉलमध्ये २८ रन केले होते. धोनीने बॅटिंग करताना थोडी आक्रमकता दाखवायला पाहिजे होती, असं वक्तव्य सचिनने केलं, यानंतर धोनीच्या फॅन्सनी सचिनवर निशाणा साधला आहे.

धोनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरच्या खेळावरच प्रश्न उपस्थित केले. एका यूजरने या दोन्ही खेळाडूंवर बनवण्यात आलेल्या बायोपिकची तुलना केली. धोनीची बायोपिक कशी सुपरहिट होती आणि सचिनची बायोपिक कशी फ्लॉप झाली, याचा दाखला या फॅनने दिला.

एका युजरने धोनी आणि सचिनच्या कारकिर्दीची तुलना केली. धोनीने आपल्या कारकिर्दीत आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकल्या. यामध्ये एक वर्ल्ड कप, टी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. दुसरीकडे सचिनला त्याच्या कारकिर्दीत एकच वर्ल्ड कप जिंकता आला, तोदेखील धोनीच्या नेतृत्वात, अशी टीका सचिनवर करण्यात आली.

धोनीच्या समर्थकांना प्रत्युत्तर द्यायला सचिनचे समर्थकही मागे राहिले नाहीत. सचिनच्या एका समर्थकाने सचिन तेंडुलकरच्या २००३ वर्ल्ड कपमधल्या कामगिरीची आठवण करुन दिली. २००३ वर्ल्ड कपमध्ये सचिनने ६७३ रन बनवले होते. तर धोनीने ४ वर्ल्ड कपमध्ये (२००७, २०११, २०१५ आणि २०१९) मिळून ५९७ रन केले आहेत, असं एक युजर ट्विटरवर म्हणाला.

सचिन तेंडुलकरच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक २,२७८ रनचा विक्रम आहे. वर्ल्ड कपमध्ये एवढ्या रन करणारा सचिन एकमेव खेळाडू आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ६ शतकं केली आहेत, हादेखील एक विक्रम आहे. धोनीने वर्ल्ड कपच्या २४ मॅचमध्ये ५९७ रन केले, यामध्ये ३ अर्धशतकं आहेत. धोनीचा वर्ल्ड कपमधला स्ट्राईक रेट ८९.१० एवढा तर सचिनचा स्ट्राईक रेट ८८.९८ आहे.