World Cup 2019 : 'डीआरएसचा निर्णय घेणं फक्त धोनीचं काम नाही'

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला. 

Updated: Jul 1, 2019, 11:28 PM IST
World Cup 2019 : 'डीआरएसचा निर्णय घेणं फक्त धोनीचं काम नाही' title=

बर्मिंघम : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला. इंग्लंडने भारताचा ३१ रनने पराभव केला. या मॅचमध्ये हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर जेसन रॉयच्या ग्लोव्हजला बॉल लागून धोनीच्या हातात गेला. पण अंपायरने जेसन रॉयला आऊट दिलं नाही. यानंतर पांड्या आणि कोहलीने रिव्ह्यू घेण्याबद्दल धोनीला विचारलं, पण धोनी रिव्ह्यू घेण्याबाबत फारसा उत्सुक नव्हता, त्यामुळे टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला नाही. रिप्लेमध्ये बघितलं असता बॉल रॉयच्या ग्लोव्हजला लागल्याचं स्पष्ट दिसत होतं.

जेसन रॉयचा रिव्ह्यू न घेण्याबाबत टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माला पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं. 'विरोधी टीमच्या खेळाडूला नॉट आऊट दिल्यानंतर रिव्ह्यू घेणं फक्त धोनीचं काम नाही, दुसऱ्या खेळाडूंची भूमिकाही महत्त्वाची असते,' असं रोहित म्हणाला.

'रिव्ह्यू घेणं ही गोष्ट फार क्लिष्ट आहे. तुम्ही प्रत्येकवेळी योग्य असाल असं होत नाही. काही खेळाडूंनी आवाज ऐकला तर काहींनी ऐकला नाही. कर्णधार दबावात होता. प्रत्येकवेळी धोनीचा निर्णय योग्य येईल ही अपेक्षा करणं योग्य नाही. कारण अनेक विचार डोक्यात सुरु असतात,' अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.

'जेव्हा निर्णय तुमच्या बाजूने जातो तेव्हा तुम्ही भाग्यवान असता. बॉलर अनेकवेळा उत्साहित होतात आणि रिव्ह्यू घ्यायला सांगतात. अनेकवेळा बॉल लाईनच्या बाहेर आहे याकडेही त्यांचं लक्ष नसतं,' असं वक्तव्य रोहितने केलं.