लंडन : वर्ल्ड कप २०१९ मधला पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला आहे. शेवटच्या ४ मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतरही पाकिस्तानला सेमी फायनल गाठता आली नाही. शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा ९४ रननी विजय झाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करुन पाकिस्तानने ५० ओव्हरमध्ये ३१५ रन केले. इमाम उल हकने १०० रन आणि बाबर आझमने ९६ रनची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा २२१ रनवर ऑलआऊट केला.
सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशचा ७ रनवर ऑलआऊट करणं गरजेचं होतं. पण असं न झाल्यामुळे पाकिस्तान सेमी फायनलमधून बाहेर पडलं.
बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद म्हणाला, 'आम्ही शेवटच्या ४ मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळलो. पण दुर्दैवानं आम्हाला सेमी फायनल गाठता आली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धचा पराभव आम्हाला सगळ्यात महाग पडला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.'
'आम्हाला एकत्र बसून खूप काम करायची गरज आहे. इमाम, बाबर, हॅरिस आणि बॉलरनी सर्वोत्तम कामगिरी केली. शाहिन आफ्रिदीने या मॅचमध्ये ६ विकेट घेतल्या. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी टीमला पाठिंबा दिलेल्या चाहत्यांचा मी आभारी आहे. त्यांनीच आमचा उत्साह वाढवला,' असं वक्तव्य सरफराजने केलं.
तर दुसरीकडे बांगलादेशचा कर्णधार मशरफे मुर्तझाने शाकीब अल हसनची माफी मागितली आहे. 'शाकीबने शेवटच्या दोन मॅचमध्ये शानदार बॅटिंग केली, पण आम्ही त्याला साथ देऊ शकलो नाही. खेळपट्टी आमच्यासाठीही अनुकूल होती, पण आम्हाला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. मला शाकीबची माफी मागायची आहे, कारण आम्ही पुढे येऊन आणखी मेहनत केली असती, तर परिणाम वेगळे असते. शाकीबने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगही चांगली केली. तो सर्वोत्तम होता,' अशी प्रतिक्रिया मशरफे मुर्तझाने दिली.