World Cup 2019 : वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यावर शिखर धवन भावूक, म्हणाला...

दुखापतग्रस्त शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Updated: Jun 19, 2019, 09:23 PM IST
World Cup 2019 : वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यावर शिखर धवन भावूक, म्हणाला... title=

साऊथम्पटन : दुखापतग्रस्त शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे मॅनेजर सुनील सुब्रमण्यम यांनी बुधवारी मीडियाला याबाबत माहिती दिली. बीसीसीआयनेही ट्विट करुन याची घोषणा केली. शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं आहे.

सुरुवातीला शिखर धवनची दुखापत १०-१२ दिवसांमध्ये ठीक होईल, असं वाटलं होतं. या कारणासाठीच शिखर धवनला बदली खेळाडू टीम इंडियाने दिला नव्हता. पण आता धवनची दुखापत बरी व्हायला जास्त वेळ लागणार असल्यामुळे त्याला वर्ल्ड कपला मुकावं लागणार आहे. शिखर धवनऐवजी ऋषभ पंतला टीममध्ये संधी देण्यात येणार आहे.

वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यावर भावूक झालेल्या शिखर धवनने ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'मी आता २०१९ वर्ल्ड कपचा हिस्सा नाही हे सांगताना भावूक होत आहे. दुर्दैवाने माझ्या अंगठ्याची दुखापत वेळेवर ठीक होत नाहीये. पण हा खेळ सुरु राहिला पाहिजे. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि समर्थन केलं त्या टीमचे साथीदार, क्रिकेटप्रेमी आणि देशाच्या सगळ्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जय हिंद' असं ट्विट शिखर धवनने केलं आहे.

शिखर धवनचा बदली खेळाडू म्हणून ऋषभ पंतला संधी द्यायची परवानगी द्यावी, अशी मागणी बीसीसीआयने आयसीसीकडे केली आहे. शिखर धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंत याआधीच इंग्लंडला पोहोचला आहे.

टीम इंडियाचा वर्ल्ड कपचा पुढचा सामना शनिवार २२ जूनला अफगाणिस्तानविरुद्ध आहे. या मॅचमध्ये ऋषभ पंत खेळणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये धवनऐवजी केएल राहुल ओपनिंगला आला होता. तर विजय शंकरला संधी देण्यात आली होती.

९ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये बॅटिंग करताना शिखर धवनच्या अंगठ्याला बॉल लागला. या मॅचमध्ये शिखर धवननं शतक केलं होतं. आयसीसी स्पर्धांमध्ये धवनने ६ शतकं केली आहेत. यातली ३ शतकं वर्ल्ड कपमधली आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये धवनची कामगिरी कायमच उल्लेखनीय राहिली आहे.