close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, २७ वर्षानंतरही रेकॉर्ड कायम

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.

Updated: Jun 17, 2019, 12:14 AM IST
World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, २७ वर्षानंतरही रेकॉर्ड कायम

मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा तब्बल ८९ रननी पराभव झाला आहे. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी ३३७ रनचं आव्हान दिलं होतं. पण पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला विजयासाठी ४० ओव्हरमध्ये ३०२ रनचं आव्हान मिळालं. पण पाकिस्तानला २१२/६ एवढाच स्कोअर करता आला.

भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. भारताने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. विजय शंकरने इमाम उल हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर फकर जमान आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानच्या इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली. फकर जमानने ६२ रन तर बाबर आजमने ४८ रनची खेळी केली. या दोघांची विकेट गेल्यानंतर मात्र पाकिस्तानला भारताच्या बॉलरनी वारंवार झटके दिले.

या विजयाबरोबरच भारताचं पाकिस्तानविरुद्धचं वर्ल्ड कपमधलं विजयाचं रेकॉर्ड कायम राहिलं आहे. वर्ल्ड कपमधला भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा ७ मॅचमधला ७वा विजय आहे. याआधी १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ साली भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.

या मॅचमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताने पाकिस्तानपुढे ३३७ रनचं आव्हान ठेवलं.

टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या काही ओव्हरमध्ये संयमी खेळी केल्यानंतर दोघांनी हाणामारी करायला सुरुवात केली. राहुल आणि रोहित यांच्यामध्ये १३६ रनची पार्टनरशीप झाली.

केएल राहुलने ७८ बॉलमध्ये ५७ रन केले. राहुलची विकेट गेल्यानंतर रोहितने विराटच्या मदतीने रनची गती कायम ठेवली. ११३ बॉलमध्ये १४० रन करुन रोहित शर्मा माघारी परतला. रोहितच्या या खेळीमध्ये १४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २४वं शतक होतं.

रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता, पण टीम इंडियाच्या दुसऱ्या बाजूने विकेट जात होत्या. हार्दिक पांड्या १९ रनवर आणि धोनी १ रनवर आऊट झाला. यानंतर पावसाचा व्यत्यय आला. पावसानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर विराट कोहलीनं विकेट गमावली. विराटने ६५ बॉलमध्ये ७७ रन केले. विजय शंकर १५ बॉलमध्ये १५ रनवर नाबाद राहिला आणि केदार जाधवने ८ बॉलमध्ये नाबाद ९ रन केले.