World Cup 2019 : श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय

वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे.

Updated: Jul 6, 2019, 11:05 PM IST
World Cup 2019 : श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय title=

लीड्स : वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेने ठेवलेल्या २६६ रनचा पाठलाग टीम इंडियाने ४३.३ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून केला. टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी शानदार शतकं केली. रोहित आणि राहुल यांच्यामध्ये १८९ रनची पार्टनरशीप झाली. रोहितने ९४ बॉलमध्ये १०३ रन केले, तर राहुल ११८ बॉलमध्ये १११ रन करुन आऊट झाला. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २७वं शतक होतं.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये नाबाद ३४ रन केले आणि हार्दिक पांड्याने नाबाद ७ रन केले. चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला ऋषभ पंत ४ रन करुन माघारी परतला. श्रीलंकेकडून मलिंगा, रजिथा आणि उडाना यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

रोहित शर्माचं या वर्ल्ड कपमधलं हे पाचवं शतक होतं. याचबरोबर एका वर्ल्ड कपमध्ये एवढी शतकं करण्याचा विक्रमही रोहितने केला. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने एका वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं केली होती. तसंच वर्ल्ड कपमध्ये रोहितच्या नावावर ६ शतकं झाली आहेत. २०१५ वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये रोहितने बांगलादेशविरुद्ध शतक केलं होतं. ६ शतकांसोबतच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिनच्या विक्रमाचीही रोहितने बरोबरी केली आहे. सचिनने ६ वर्ल्ड कपमध्ये ६ शतकं केली. तर रोहितचा हा दुसराच वर्ल्ड कप आहे.

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने आधीच प्रवेश केला होता. तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर झाली आहे. या विजयासोबत टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. पण दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला तर ऑस्ट्रेलिया पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ५५ रनवर श्रीलंकेने त्यांच्या ४ विकेट गमावल्या होत्या, पण मॅथ्यूज आणि थिरमानेने १२४ रनची पार्टनरशीप केली. मॅथ्यूजने १२८ बॉलमध्ये ११३ रन केले, तर थिरमानेला ६८ बॉलमध्ये ५३ रन करता आले. मॅथ्यूजचं हे वनडे क्रिकेटमधलं तिसरं शतक होतं. मुख्य म्हणजे मॅथ्यूजने वनडे क्रिकेटमधली त्याची तिन्ही शतकं भारताविरुद्ध केली आहेत.

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. या मॅचमध्ये बुमराहने श्रीलंकेला पहिलाच धक्का दिमुथ करुणारत्नेच्या रुपात दिला. बुमराहची वनडे क्रिकेटमधली ही १००वी विकेट होती. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

या मॅचमध्ये टीम इंडियाने २ बदल केले. मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांना या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली. या दोघांच्याऐवजी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवचा टीममध्ये समावेश झाला.