VIDEO: विराट कोहली बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करतो तेव्हा...

विराटने बुमराहच्या शैलीत रनअप घेऊन नंतर त्याच्याच स्टाईलमध्ये सेलिब्रेशनही केले.

Updated: Jul 9, 2019, 10:34 PM IST
VIDEO: विराट कोहली बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करतो तेव्हा... title=

मुंबई: विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेला भारतीय संघ सध्या मैदानावरील कामगिरीसोबत मैदानाबाहेरील गोष्टींमुळेही चांगलाच चर्चेत असतो. आता यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या भन्नाट किस्स्याची भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाच्या सरावादरम्यानचा एक व्हीडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हीडिओत विराट कोहली भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीची नक्कल करताना दिसत आहे. 

यंदाच्या विश्वचषकात जसप्रीत बुमराहने अत्यंत भेदक मारा करून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले आहे. मात्र, बुमराहचा विचित्र रनअप नेहमीच चर्चेचा विषय असतो. विराट कोहलीनेही नेमकी हीच बाब हेरून सरावाच्यावेळी बुमराहची नक्कल करुन दाखवली. विराटने बुमराहच्या शैलीत रनअप घेऊन नंतर त्याच्याच स्टाईलमध्ये सेलिब्रेशनही केले. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. या सामन्यात पाऊस पडणार, अशी शक्यता अगोदरच वर्तवण्यात आली होती. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय न्यूझीलंडसाठी तितकासा फलदायी ठरला नव्हता. ४६.१ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडने ५ विकेटच्या मोबदल्यात २११ धावा केल्या आहेत. अवघ्या २३ चेंडूंचा खेळ शिल्लक असताना सामन्यात पाऊस पडायला सुरुवात झाली होती.