Semi Finals साठी जागा 1 संघ 4.. ऑस्ट्रेलियामुळे पाक, न्यूझीलंड टेन्शनमध्ये कारण.. पाहा Points Table

World Cup 2023 Points Table Semi Final Equation For Pakistan And New Zealand: अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने सेमीफायनल्सच्या यादीमधील आणखीन एका संघाचं स्थान निश्चित झालं आहे. आता एका जागेसाठी 4 संघ स्पर्धेत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 8, 2023, 04:44 PM IST
Semi Finals साठी जागा 1 संघ 4.. ऑस्ट्रेलियामुळे पाक, न्यूझीलंड टेन्शनमध्ये कारण.. पाहा Points Table title=
ऑस्ट्रेलियन संघही सेमीफायनलसाठी पात्र ठरला

World Cup 2023 Points Table Semi Final Equation For Pakistan And New Zealand: ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला. या विजयासहीत ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. 292 धावांचा पाठलाग करताना 100 धावांच्या आत 7 गडी बाद झालेले असताना मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या दोघांनी अधिक पडझड न होऊ देता सामना जिंकवून दिला. या सामन्यामध्ये मॅक्सवेलने नाबाद 201 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. मॅक्सेवेलच्या या खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले असले तरी या विजयानंतर आता सेमीफायलनमधील अव्वल 4 संघांपैकी केवळ एकाच संघासाठी जागा शिल्लक राहिली आहे.

हे 4 संघ शर्यतीमध्ये

ऑस्ट्रेलियावरुद्धचा सामना गमावल्याने आता अफगाणिस्तान पॉइण्ट्स टेबलमध्ये 8 पॉइण्ट्ससहीत सहाव्या स्थानी आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड आणि पाकिस्तानचेही प्रत्येकी 8 पॉइण्ट्सच आहेत. मात्र त्यांचा नेट रन रेट अधिक चांगला असल्याने ते अफगाणिस्तानपेक्षा वरच्या स्थानी आहेत. या तिन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना बाकी आहे. या तिन्ही संघांकडे पात्र ठरण्याची संधी अद्यापही कायम आहे. तिन्ही संघांनी त्यांचा उरलेला सामना जिंकला तर नेट रन रेटच्या जोरावर सेमीफायनल्समधील चौथा संघ निश्चित केला जाईल. शेवटचा सामना तिघांनीही जिंकला तर त्यांचे 10 पॉइण्ट्स होतील. तसेच नेदरलॅण्डचे 2 सामने बाकी असून ते दोन्ही त्यांनी जिंकले तर त्यांचेही 10 पॉइण्टस होतील. सेमीफायलनसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने या चारही संघांना नेमकं काय करावं लागेल पाहूयात...

न्यूझीलंड

न्यूझीलंडला सेमीफायनल्ससाठी पात्र होण्याच्या दृष्टीने त्यांचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. त्यांचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी त्यांचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. मात्र केवळ विजयाने पाकिस्तानला पात्र ठरता येणार नाही. न्यूझीलंडचा त्यांच्या अंतिम सामन्यात पराभव झाला तरच पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल. तसेच पाकिस्तानला मोठ्या विजयाची गरज आहे असं झालं तर नेट रन रेटमध्ये ते न्यूझीलंडला मागे टाकतील. पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला असला तरी त्यांना अजूनही सेमीफायनल्ससाठीची संधी आहे. शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून पाकिस्तान आणि न्यूझीलंडला नेट रन रेटमध्ये मागे टाकण्याची अफगाणिस्तानला गरज आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत झाले तरी अफगाणिस्तानला फायदा होणार आहे. अफगाणिस्तानचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

नेदरलॅण्ड

नेदरलॅण्ड सेमीफायनलमध्ये पात्र होण्याची शक्यता फारच कमी असली तरी ती नाकारता येणार नाही. शेवटचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकून 4 गुणांसहीत नेट रन रेटच्या जोरावर हा नवखा संघही सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकतो. नेदरलॅण्डचे उर्वरित 2 सामने इंग्लंड आणि भारताविरुद्ध होणार आहे.

भारत अव्वल तर हे संघ स्पर्धेतून झाले बाद

भारत हा पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असून त्या खालोखाल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. बांगलादेश, श्रीलंका, इंग्लंड हे तिन्ही संघ सेमीफायलनच्या रेसमधून बाहेर पडले आहेत.