वर्ल्डकप फायनलपूर्वी मोहम्मद शमीसाठी वाईट बातमी, भाऊ आणि पुतण्या पोहोचला स्टेडिअमध्ये

Mohammed Shami : वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने समोरच्या संघातील फलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. वर्ल्डकपच्या सामन्यातही शमी जोरदार तयारीने मैदानात उतरणार आहे. मात्र त्याआधीच शमीसाठी वाईट बातमी आली आहे.

Updated: Nov 19, 2023, 03:10 PM IST
वर्ल्डकप फायनलपूर्वी मोहम्मद शमीसाठी वाईट बातमी, भाऊ आणि पुतण्या पोहोचला स्टेडिअमध्ये title=
(Photo Credit : AP)

World Cup 2023 Final IND vs AUS : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरु झाला आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. मात्र त्याआधीच फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीसाठी (mohammed shami) वाईट बातमी आली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आई अंजुम आरा यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मोहम्मद शमी याची चिंता वाढली आहे. शमीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळणार आहे. मात्र सामना सुरु होण्यापूर्वीच मोहम्मद शमीसाठी वाईट बातमी आली आहे. शमीच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. शमी यांच्या आईला उत्तर प्रदेशाती अमरोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शमीची आई अंजुम आराची तब्येत का बिघडली याची माहिती समोर आलेली नाही. सध्या शमीची बहीण त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे. तर शमीचा मोठा भाऊ हबीब आणि पुतणे वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत.

सकाळीच आईसोबत साधला होता संवाद 

दुसरीकडे, प्रकृती ढासळण्यापूर्वी शमीच्या आईने सकाळीच भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. विश्वचषक फायनलबाबत शमीच्या गावात उत्सवाचे वातावरण आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तो म्हणाला की, संपूर्ण देश आपला मुलगा मोहम्मद सिम्मीचे कौतुक करत आहे. त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. सिम्मी खूप छान खेळला आहे. सारा देश जल्लोष करत असताना, मी त्याची आई आहे, माझे काय होणार? इन्शाअल्लाह भारत विश्वचषक जिंकेल. सिम्मी चांगली कामगिरी करेल. आज सकाळीच शमीशी बोललो होते आणि त्याने सर्वांची चौकशी केली, असे अंजुम आरा यांनी म्हटलं होतं.

"जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता आणि देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटतो. इंशाअल्लाह शमीला नक्कीच यश मिळेल. आमच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. आम्हाला आशा आहे की शमीला नक्कीच यश मिळेल आणि तो भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल. मी शमीचा संपूर्ण सामना पाहते. तो चांगली कामगिरी करत आहे याचा मला खूप आनंद वाटतो. अंतिम फेरीत भारताला चॅम्पियन बनवण्यात तो नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल," असेही अंजुम आरा म्हणाल्या होत्या.

दरम्यान,  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने आतापर्यंत 10 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमी विजयाचा हिरो ठरला होता. या सामन्यात त्याने 7 विकेट घेत इतिहास रचला होता.