VIDEO: वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच शून्यावर बाद झाल्याने विराट भडकला, असा काढला राग

World Cup 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी रविवारची खेळी ही कधीही न विसरता येणारी ठरली आहे. कोहली शून्यावर बाद झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विराटही यानंतर संतापलेला होता.

आकाश नेटके | Updated: Oct 29, 2023, 05:20 PM IST
VIDEO: वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच शून्यावर बाद झाल्याने विराट भडकला, असा काढला राग title=

World Cup 2023 : भारतीय संघ आज वर्ल्डकप 2023 मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध (ind vs eng) खेळत आहे. लखनऊच्या (lucknow) एकाना स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघाने (Team India) प्रथम फलंदाजी केली. या विश्वचषकात भारताने प्रथम फलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ होती. आतापर्यंतची कामगिरी पाहता भारत विजयाचा दावेदार मानला जात होता, मात्र इंग्लंडने झटपट विकेट घेत भारतीय संघावर दडपण आणलं आहे. चाहत्यांना आज विराट कोहलीकडून (Virat Kohli) दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण असे काहीही घडले नाही. कोहली इंग्लडच्या संघासमोर अपयशी ठरला आणि शून्यावर बाद झाला. बाद झाल्यानंतर ज्याप्रकार विराटने राग व्यक्त केला त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरुवातीला फलंदाजी करताना शुभमन गिल 9 धावा करून बाद झाला. पहिला विकेट पडल्यानंतर विराट कोहली क्रीजवर उतरला होता. किंग कोहलीची आणखी एक दमदार खेळी पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र 9 चेंडू खेळूनही कोहलीला खाते उघडता आले नाही. वर्ल्डकपच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कोहली शून्यावर बाद झाला. यानंतर कोहली ड्रेसिंग रुममध्ये खूप संतापलेला दिसत होता. शेजारील सोफ्यावर जोरात हात आपटून त्याने संताप व्यक्त केला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोहली एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 56 डावांमध्ये धावा केल्याशिवाय कधीही बाद झाला नव्हता. लखनऊमध्ये त्याचा हा रेकॉर्ड तुटला. 8 चेंडूपर्यंत पहिली धाव न मिळाल्याने कोहलीचा संयम सुटला आणि तो डेव्हिड विलीच्या गुड लेन्थवर मोठा शॉट खेळायला गेला. पण बॅटचा चेंडूशी योग्य संपर्क झाला नाही आणि चेंडू मिड-ऑफला गेला. तिथे बेन स्टोक्सने झेल घेतला आणि विराटला माघारी पाठवले.

या वर्ल्डकपमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्या शतक झळकावलं होतं. न्यूझीलंडच्या संघाविरुद्धही तो चांगली फलंदाजी करत होता. पण धरमशालामध्ये विराटचे शतक अवघ्या 5 धावांनी हुकले आणि तो 95 धावांवर बाद झाला. आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लवकर बाद झाल्याने विराटस त्याचे चाहतेही खूप निराश झाले आहेत.