World Cup 2023 India Vs Pakistan: रोहित ठरला टॉस का बॉस! अशी आहे भारताची Playing XI

World Cup 2023 India vs Pakistan Indian Playing 11: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून भारताने संघामध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. यासंदर्भातील माहिती रोहित शर्माने दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2023, 01:55 PM IST
World Cup 2023 India Vs Pakistan: रोहित ठरला टॉस का बॉस! अशी आहे भारताची Playing XI
रोहित शर्माने दिली माहिती

World Cup 2023 India vs Pakistan Indian Playing 11: भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यामध्ये आधीच्या सामन्यातील संघात एक महत्वाचा बदल केला आहे. भारताने सलामीवर इशान किशनच्या जागी शुभमन गिलला संधी दिली आहे. शुभमनग गिलला डेंग्युची लागण झाल्याने तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये खेळला नव्हता. शुभमनचं पुनरागमन झाल्याने भारतीय संघाच्या फलंदाजीला बळकटी मिळणार आहे. शुभनला संघात संधी दिल्याने इशान किशनला संघाबाहेर बसवण्यात आलं आहे. मात्र इशानला संघाबाहेर बसवावं लागत असल्याची खंत रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर बोलताना व्यक्त केली.

Add Zee News as a Preferred Source

दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा

"त्याने (इशानने) चांगली कामगिरी केली आहे. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मात्र शुभमनसाठी त्याला संघाबाहेर बसावावं लागत आहे. मला त्याच्यासाठी वाईट वाटत आहे. पण आमच्याकडे इतर पर्याय नव्हता," असं रोहितने नाणेफेक जिंकल्यानंतर म्हटलं. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघामध्ये कोणताही बदल नसल्याचं पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने स्पष्ट केलं आहे. भारत आणि पाकिस्तानचा संघ या स्पर्धेमध्ये अद्याप अजेय आहे. पाकिस्तानने नेदरलॅण्ड आणि श्रीलंकेला पराभूत केलं आहे. तर भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे. दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये असून आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

लाखो प्रेक्षकांची उपस्थिती

भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हे भारतामधील सर्वात मोठं क्रिकेट मैदान असून या मैदानाची क्षमता 1.32 लाख प्रेक्षकांची आहे. या सामन्याला 1 लाखांहून अधिक प्रेक्षक प्रत्यक्षात उपस्थित असतील असं सांगितलं जात आहे.

7-0 असा रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तान यापूर्वी वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये 7 वेळा आमने-सामने आले आहेत. सातही वेळेस भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पाकिस्तानविरुद्धचा हा विक्रम अबाधित राखण्याच्या हेतूनेच रोहितच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरले. तर दुसरीकडे पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने 'आपण आधीच्या आकडेवारीकडे लक्ष देत नाही. आपण वर्तमानात जगतो आणि माझा माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे की ते चांगला खेळ करतील,' अशी प्रतिक्रिया या 7-0 रेकॉर्डबद्दल बोलताना दिली होती.

असा आहे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील भारतीय संघ -

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More