World Cup 2023 India Vs Pakistan: वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील सर्वात रोमहर्षक सामना आज गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा आपला शेवटचा सामना 8 विकेट्सने जिंकला तर दुसरीकडे पाकिस्तानने सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करत श्रीलंकेला आपल्या शेवटच्या सामन्यात धूळ चारली. दोन्ही संघांनी स्पर्धेतील आपआपले दोन्ही सामने जिंकले आहेत. या सामन्याआधी भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसंदर्भात सूचक विधान केलं आहे.
गौतम गंभीरने जसप्रीत बुमराहचं कौतुक करताना, "तो जगातील सर्वात खतरनाक गोलंदाज आहे," असं म्हटलं. तसेच जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदीमध्ये फार मोठा फरक आहे असंही गंभीरने म्हटलं आहे. बुमराहचं कौतुक करताना गंभीरने, "ज्या पद्धतीने त्याने मिचेल मार्शला बाद केलं (ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात) त्यानंतर त्याने ज्या पद्धतीने इब्राहिम झारदानला बाद केलं ते पाहून जसप्रीत बुमराह हाच जगातील सर्वात खतरनाक आणि परिपूर्ण गोलंदाज आहे असं म्हणता येईल," असंही म्हटलं.
"आपण जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदीची सुरुवातीला तुलना केली. मात्र त्या दोघांमध्ये फार फरक आहेत. मला असा एक गोलंदाज सांगा जो सर्वच पद्धतीने सामन्यावर प्रभाव टाकू शकतो. गोलंदाज नव्या चेंडूने उत्तम गोलंदाजी करतात किंवा सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये उत्तम गोलंदाजी करतात. मात्र बुमराह सामन्यातील कोणत्याही टप्प्यामध्ये, मधल्या षटकांमध्ये, नवीन चेंडूने किंवा शेवटच्या काही षटकांमध्येही आपला प्रभाव पाडतो," असं गौतम गंभीर म्हणाला.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीत बुमराहने वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 6 विकेट्स घेतल्या असून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीतच बुमराह पहिल्या 11 सामन्यानंतर अव्वल 5 गोलंदाजांपैकी एक आहे.
शाहीन शाह आफ्रिदीला अजून यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत नावाला साजेसी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील 46 सामन्यामध्ये 24.00 च्या सरासरीने 88 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्द त्याने 3 सामने खेळले असून 31.20 च्या सरासरीने त्याने 5 विकेट्स घेतल्यात. भारताविरुद्ध त्याची सर्वोत्तम कामगिरी आशिया चषक स्पर्धेत केली होती. त्याने 35 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. भारताविरुद्ध शाहीन शाह आफ्रिदी सर्वात आधी 2018 साली दुबईत खेळला होता. या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आळी नव्हती. भारताने रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या शतकांच्या जोरावर हा सामना 9 विकेट्सने जिंकलेला. सध्याच्या स्पर्धेत शाहीन शाह आफ्रिदीला नेदरलॅण्ड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीमधून प्रभाव पाडता आला नाही. त्याने आतापर्यंतच्या स्पर्धेत 103 धावा देऊन केवळ 2 विकेट्स घेतल्यात.