India Vs Pakistan Mauka Mauka Ad: भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हटल्यानंतर चाहत्यांना आठवणारी पहिली गोष्ट म्हणजे 'मौका मौका.. मौका मौका.. मौका' जाहिरात. 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानला आमने सामने पाहण्याचा मौका दोन्ही देशातील चाहत्यांना लवकरच मिळणार आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही स्टार स्पोर्ट्सकडून भारत पाकिस्तानदरम्यानच्या वर्ल्डकप सामन्यासाठी विशेष 'मौका मौका..' थीमवर आधारित जाहिरात केली जात आहे. विशेष म्हणजे यंदाच्या जाहिरातीमध्ये भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाही पाकिस्तानी संघाला आणि चाहत्यांना ट्रोल करणार आहे. या जाहिरातीच्या शूटींगचा सेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दरवेळेस पाकिस्तानच्या पराभवामुळे निराश होणारा पाकिस्तानी चाहता साकारणारा कलाकार आणि रविंद्र जडेजाही दिसत आहे.
यंदाची संपूर्ण विश्वचषक स्पर्धा भारतामध्ये खेळवली जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर होणाऱ्या या सामन्याच्या जाहिराती आता टीव्हीवर दाखवल्या जाणार आहेत. मात्र त्यातही भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची सर्वच भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्याने वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 14 सप्टेंबर रोजी गुजरातमधील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. भारताचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे तर बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. आशिया चषक स्पर्धेमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांपैकी पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसऱ्या सामन्यामध्ये सुपर 4 च्या फेरीत भारताने पाकिस्तानला 228 धावांनी धूळ चारली होती.
मात्र असं असलं तरी हे दोन्ही संघ आमने-सामने येतात तेव्हा ती पर्वणीच असते. वर्ल्डकपचं प्रकरणास स्टार स्पोर्ट्स करणार असल्याने त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पुन्हा एकदा मौका मौका... थीमवर जाहिरात शूट केली आहे. या जाहिरातीच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल झाला असून यात रविंद्र जडेजा गोलंदाजी करताना, फलंदाजी करताना, डाइव्ह मारताना दिसत आहेत. तसेच जडेजाबरोबर पाकिस्तानी चाहता साकारणारा अभिनेता विशाल मल्होत्राही पाकिस्तानी संघाच्या जर्सीमध्ये या जाहिरातीच्या सेटवर दिसून येत आहे. तुम्हीच पाहा हा सेटवरील व्हिडीओ...
Is Mauka Mauka making a return?
Maukaman and Ravindra Jadeja spotted together in the Star Sports shoot. pic.twitter.com/tNbG21bnHa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 26, 2023
'मौका मौका..' जाहिरात सर्वात आधी 2015 साली आयसीसीच्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दाखवण्यात आली होती. केवळ ग्रुप स्टेजमधील सामन्यासाठी ही जाहिरात त्यावेळी बनवण्यात आली होती. मात्र ही जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर आयसीसीच्या प्रत्येक मोठ्या मालिकेआधी या थीमवर आधारित जाहिरात तयार करण्यात येते. भारत आयसीसीच्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभूत झालेला नाही. दोन्ही संघ वर्ल्डकपमध्ये 7 सामने खेळले आहेत.