Sachin Tendulkar On Ind vs Pak Match: भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार असून दोन्ही संघ अहदाबादमध्ये दाखल झाले आहेत. या सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारताचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे तर पाकिस्तानचं नेतृत्व बाबर आझम करणार आहे. पाकिस्तान आणि भारत दोघांनीही आपआपले पहिले दोन्ही सामने जिंकले असून अहमदाबादमध्ये पराभूत होणाऱ्या संघाचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलाच पराभव ठरणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल 4 मध्ये आहे.
भारतासाठी आतापर्यंत वर्ल्ड कपमधील प्रवास हा सुखकर राहिला आहे. भारताने बुधवारी अफगाणिस्तानला पराभूत केलं. या सामन्यामध्ये रोहित शर्माने दमदार शतक झळकावलं. रोहित शर्माने या सामन्यात अवघ्या 63 चेंडूंमध्ये शतक झळाकवलं. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहलीनेही अर्धशतकं झाळकावली आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमारहाने 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजमध्येही भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी संतुलीत असल्याचं चित्र दिसत आहे.
यापूर्वी वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्या सामन्यात भारताकडून विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी संयमी खेळी करत अर्धशतकांच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियान संघाला स्वस्तात गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली होती. याच सर्व कामगिरीमुळे भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याआधी भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने मोठं विधान केलं आहे.
सचिन तेंडुलकर भारताच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर समाधानी आहे. "बुमराह आणि रोहितने उत्तम कामगिरी केली आहे. या दोघांनाही भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी उत्तम साथ दिली. भारताच्या दोन्ही सामन्यांमध्ये 2 वेगवेगळ्या सेटमधील खेळाडूंनी जबाबदारी पार पाडत भारताला विजय मिळवून दिला. यामुळे भारतीय संघ 14 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी सज्ज आहे असं दिसतंय. पुढील सामन्याची वाट पाहतोय," असं सचिनने आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
Two fine performances by Bumrah and Rohit, who were well supported by the bowling and batting units respectively.
The 2 games have seen different players contributing and that sets things up nicely for the 14th of October. Look forward!#INDvAFG pic.twitter.com/EXQltgeut3— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 11, 2023
भारत आणि पाकिस्तानचा संघ शनिवारी होणाऱ्या सामन्यासाठी गुरुवारी सायंकाळी अहमदाबादमध्ये दाखल झाले. या सामन्यादरम्यान एक छोटा संस्कृतिक कार्यक्रमही पार पडणार आहे. यासाठी बीसीसीआयने विशेष तयारी केली आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली असून सामन्यासाठी मोठ्या संख्येनं चाहते उपस्थित असतील असं सांगितलं जात आहे.