World Cup 2023 Shreyas Iyer After IND vs SL Match: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 मधील श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला. भारताने आपला सातवा सामना जिंकत अपराजित राहणारा एकमेव संघ ही ओळख गुरुवारीही कायम ठेवली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांबरोबरच गोलंदाजींनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना तब्बल 302 धावांच्या फरकाने जिंकला. आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली. भारतीय फलंदाजांपैकी विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल यांनी भन्नाट फटकेबाजी केली. त्यानंतर मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने श्रीलंकन संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावत संपूर्ण संघाला 55 वर बाद केलं. या सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यरने एक मजेदार वक्तव्य केलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर भारतीय गोलंदाजीबद्दल बोलताना श्रेयस अय्यरने भारतीय गोलंदाजांपैकी मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचा सामना आपल्याला करावा लागत नाही याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. "आज आणि आधीच्या सामन्यात त्यांनी केलेली गोलंदाजी पाहिली तर आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला त्यांच्याविरुद्ध खेळावं लागत नाही. मात्र त्याचवेळी आम्ही त्यांच्याबरोबर नेट्समध्ये सराव केला आहे. त्यांच्याबरोबर सराव केल्याने आम्हाला कोणत्याही गोलंदाजाला खेळून काढण्याची प्रेरणा मिळते," असं अय्यरने सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.
नक्की वाचा >> 'दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप जिंकला नाही तर...', डिव्हिलियर्सचं मत; भारतालाही दिला इशारा
आताची गोलंदाजांची कामगिरी उत्तम आहे की आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील उत्तम होती? असा प्रश्न विचारण्यात आला. "मला वाटतं सध्याच्या गोलंदाजांची फळी उत्तम आहे कारण मी आशिया चषकाच्या अंतिम सामन्याला मैदानाबाहेर ड्रेसिंग रुममध्ये बसलेलो. बाहेर बसून हे पाहणं फार वेगळं आहे. आता मी खेळत आहे. आजची कामगिरी ही फारच उत्तम होती. खास करुन गोलंदाजांची कामगिरी पाहता ते संघाला गरज असतानाच संघासाठी उभे राहिले. आम्हाला 2 ते 3 विकेट्स मिळाल्यानंतर विकेट्स घेण्यावर लक्ष केंद्रित केलं. गोलंदाजी असो किंवा फिल्डींग असो आम्ही झेल घेत गोलंदाजांना मदत करण्याचा प्रयत्न केला. सध्या संघ फार उत्तम खेळतोय," असं श्रेयस अय्यर म्हणाला. श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध 56 बॉलमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.
नक्की वाचा >> शमीवर झालेला देशद्रोहाचा आरोप; भावूक होऊन म्हणालेला, 'मी मरेन पण...'
मोहम्मद शामी, मोम्मद सिराज, जसप्रीत बुमराहच्या भन्नाट गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेला केवळ 55 धावांवर बाद केलं. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. शमीने 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने 1 विकेट घेतली, सिराजने 3 विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजालाही एक विकेट मिळाली. या सामन्यामध्ये श्रीलंकन संघ फलंदाजीसाठी आल्यानंतर दुसऱ्या डावातील पहिल्याच बॉलवर जसप्रीत बुमराहने विकेट घेतली. यापूर्वी वर्ल्ड कपमधील भारतीय सामन्यामध्ये अशाप्रकारे पहिल्याच चेंडूवर विरोधी संघातील फलंदाजाला बाद करण्याचा प्रकार कधीच घडला नव्हता.