भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात धीम्या गतीने खेळी केली असा आरोप पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफिजने केली आहे. त्याने विराट कोहलीला स्वार्थी म्हटलं आहे. वर्ल्डकपमध्ये तिसऱ्यांदा त्याने हा प्रकार केल्याचाही आरोप त्याने केला आहे. दरम्यान, मोहम्मद हाफिजच्या या टीकेला इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन याने उत्तर देत हा मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. तसंच तो अत्यंत जबाबदारीने खेळला असल्याची जाणीव करुन दिली.
वर्ल्डकपमध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या सामन्यात विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील 49 वं शतक ठोकलं. या शतकासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 326 धावा केल्या. विराट कोहलीने या सामन्यात 121 चेंडूत 101 धावा केल्या. एकीकडे विराटने शतक केल्याने आनंद व्यक्त होत असताना, काहींना मात्र त्याने फार धीम्या गतीने खेळी करण्यावरुन नाराजी जाहीर केली.
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची समीक्षा केली जात असताना एका कार्यक्रमात मोहम्मद हाफिज म्हणाला की, "मला विराट कोहलीच्या फलंदाजीत स्वार्थीपणा दिसत आहे. वर्ल्डकपमध्ये हे तिसऱ्यांदा झालं आहे. 49 व्या ओव्हरमध्ये तो शतक पूर्ण करण्यासाठी एक-एक धावा काढत होता. त्याने संघाला प्राथमिकता दिली नाही. रोहित शर्माही स्वार्थीपणे खेळू शकला असता. पण तो स्वत:साठी नव्हे तर संघासाठी खेळत आहे. जर भारताचा पराभव झाला असता तर शेवटच्या ओव्हर्समध्ये विराटने न केलेल्या धावाच कारणीभूत ठरल्या असत्या".
Mohammad Hafeez. 'I saw sense of selfishness in Virat Kohli's batting and this happened for the third time in this World Cup. In the 49th over, he was looking to take a single to reach his own hundred and he didn't put the team first'.#INDvsSA | #ViratKohli | #RohitSharma pic.twitter.com/50VoKGXZhq
— Immy (@TotallyImro45) November 6, 2023
मोहम्मद हाफिजची ही टीका ऐकल्यानंतर मायकल वॉनने आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत त्याला खडेबोल सुनावले आहेत. "भारताने 8 संघांना धूळ चारली आहे. विराट कोहलीच्या नावे आता 49 शतकं असून, इतक्या अवघड खेळपट्टीवर त्याने महत्त्वाची खेळी केली. त्याचा संघ 200 पेक्षा जास्त धावांनी जिंकला. हा मूर्खपणा आहे," असं मायकल वॉन म्हणाला आहे.
Come on @MHafeez22 !!! India have hammered 8 teams playing great cricket .. @imVkohli now has 49 tons and his last was an anchor role innings on a tricky pitch .. His team won by over 200 !!!! This is utter nonsense .. #CWC2023 #India #Pakistan https://t.co/Foh3hhz3RE
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 7, 2023
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या शतकांची बरोबरी केल्यानंतर संवाद साधताना ही खेळपट्टी किती अवघड आहे हे समजावलं. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची विकेट गेल्यानंतर ड्रेसिंग रुममधून विराट कोहलीसाठी संदेश पाठवण्यात आला होता. तू एका बाजूला विकेट सांभाळून ठेव आणि इतरांना फटकेबाजी करु दे असं या संदेशात सांगण्यात आलं होतं असा खुलासा स्वत: विराटने केला आहे.
"या खेळपट्टीवर खेळणं थोडं अवघड होतं. रोहित आणि शुभमन यांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. तो सूर कायम ठेवणं ही माझी जबाबदारी होती. 10 व्या ओव्हरला चेंडू फिरु लागला होता. तो धीम्या गतीने बॅटवर येत होता. विकेट टिकवून संयमाने खेळणं आणि इतरांना खेळू देणं ही माझी जबाबदारी होती. संघ व्यवस्थापनाकडून मला हेच सांगण्यात आलं होतं," अशी माहिती विराट कोहलीने दिली.