ICC World Cup मध्ये भारत वि. पाकिस्तान सेमीफायनल रंगणार? असं आहे समीकरण

ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असून सेमीफायनलच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतोय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं स्थान निश्चित झालं आहे. पण इतर दोन जागांसाठी जबरदस्त चुरस आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 7, 2023, 01:20 PM IST
ICC World Cup मध्ये भारत वि. पाकिस्तान सेमीफायनल रंगणार? असं आहे समीकरण title=

ICC World Cup Semifinal : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाची (Team  India) विजय घोडदौड सुरु आहे. सलग आठ सामने जिंकत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये (World Cup Semifinal) प्रवेश करणारी पहिली टीम ठरलीय. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 243 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयाबरोबर टीम इंडिया पॉईंटटेबलमध्ये (World Cup PointTable) पहिल्या स्थानावर पोहोचलीय आणि सेमीफायनलमध्येही टीम इंडियाचं पहिलं स्थान कायम राहणार आहे. भारताबरोबरच दक्षिण आफ्रिकेनेही (South Africa) सेमीफायनलचं स्थान निश्चित केलंआहे.  उरलेल्या दोन संघांचं चित्र अद्यापही स्पष्ट नही. त्यामुळे भारताबरोबर सेमीफायनलमध्ये कोणता संघ खेळणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागलीय. 

टीम इंडियाने सलग आठ सामने जिंकल्याने 16 पॉईंट खात्यात आहेत. आता जवळपास इतर सर्वच संघांचे प्रत्येकी सात ते आठ सामने झालेत. त्यामुळे टीम इंडियाचं अव्वल स्थान कायम राहाणार आहे. भारताचा लीगमधला नववा आणि शेवटचासामना  12 नोव्हेंबरला नेदरलँडशी (Netherland) होणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेने आठपैकी सहा सामन्यात विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना अफगाणिस्तानबरोबर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत दुसरं स्थान कायम राखण्याचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर असेल. 

या तीन संघात चुरस
उरलेल्या दोन जागांपैकी तीन संघांमध्ये जबरदस्त चुरस आहे. सध्या तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांच्या खात्यात 7 सामन्यात दहा पॉईंट जमा आहेत. ऑस्ट्रेलियाचे पुढचे दोन सामने अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास ऑस्ट्रेलियाच्या खात्यात चौदा पॉईंट जमा होतील आणि ऑस्ट्रेलिया थेट दुसऱ्या स्थानासाठी आव्हान निर्माण करेल. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया असणार हे जवळपास निश्चित झालंय. पण टीम इंडियाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी घेणं देणं नाही. 

सेमीफायनलमध्ये पहिल्या स्थानावर असलेला संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांदरम्यान सेमीफानयलचा सामना रंगणार आहे. आता चौथ्या जागेसाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांदरम्यान जबरदस्त चुर आहे. पॉईंटटेबलमध्ये सध्या चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे. 

न्यूझीलंड की पाकिस्तान?
न्यूझीलंडने आठ सामन्यात चार विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात आठ पॉईंट जमा आहेत. तर पाकिस्तानच्या खात्यातही आठ पॉईंट आहेत. पण चांगल्या रनरेटच्या जोरावर न्यूझीलंड सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. तर पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान शेवटच्या सामन्यात जिंकले तर नेट रनरेटच्या आधारावर चौथ्या जागेचा निर्णय होईल. पण न्यूझीलंड संघ श्रीलंकेविरुद्ध हरला आणि पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध जिंकला तर मात्र पाकिस्तानला नेट रनरेटची गरज उरणार आहे. पाकिस्तान थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचेल. अशात भारत आणि पाकिस्तान सेमीफायनल सामना खेळवला जाईल. 

पण चौथ्या जागेसाठीच्या शर्यतीत अफगाणिस्तानही आहे. अफगाणिस्ताननेही आठ सामन्यात चार विजय मिळवलेत आणि त्यांच्या खात्यातही आठ पॉईंट जमा आहेत. पण नेट रनरेट मायनसमध्ये असल्याने अफगाणिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचे पुढचे दोन सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्या संघांविरुद्ध आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेत दमदार खेळाचं प्रदर्शन केलं आहे. पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका सारख्य बलाढ्य सघाला हरवण्याचा पराक्रम अफगाणिस्तानने केलाय. अशात अफगाणिस्तानने आपेल दोन्ही सामने जिंकले तर मात्र भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान सेमीफायनल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.