World Cup Bangladesh Bowler Dance Celebration: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये बांगलादेशच्या संघाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात पराभूत केलं आहे. दक्षिण आफ्रिकन सलामीवीर क्विंटन डिकॉकने 140 बॉलमध्ये 15 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 174 धावा केल्या. याच जोरावर दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 382 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 233 धावांमध्ये तंबूत परतला आणि दक्षिण आफ्रिकेने हा सामना 149 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनने 90 आणि अॅडम मार्करमने 60 धावा केल्या. बांगलादेशच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना बाद करण्यात अपयश आलेच पण धावसंख्याही त्यांना रोखता आली नाही. फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराज वगळता सर्वच गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकन फलंदाजीनी फोडून काढलं.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळीदरम्यान एक रंजक गोष्ट घडली. बांगलादेशचा गोलंदाज शोरिफुल इस्लामने मैदानातच भारतीय अभिनेता हृतिक रोशनसारख्या डान्स स्टेप करुन दाखवल्या. हृतिकच्या 'कहो ना प्यार है' चित्रपटातील 'एक पल का जिना' गाण्यातील आयकॉनिक स्टेप शोरिफुल इस्लामने करुन दाखवली. दक्षिण आफ्रिकेचा सालामीवीर रीजा हेंड्रिक्सला बोल्ड केल्यानंतर आनंद साजरा करताना शोरिफुल इस्लामने हृतिकच्या या फेमस स्टेप्स केल्या. हेंड्रिक्स केवळ 12 धावा करुन तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट हेंड्रिक्सच्या रुपात पडली. शोरिफुल इस्लामच्या डान्सचा व्हिडीओ बंगलादेश टायगर्सच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन शेअर केला आहे.
शोरिफुल इस्लामचा हा डान्स पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने शोरिफुल इस्लाम हृतिकलाही लाजवेल असा नाचल्याचं म्हटलं आहे. अन्य एकाने शोरिफुल इस्लामच्या स्टेप्स फारच उत्तम असल्याचं म्हटलं आहे. तुम्हीच पाहा शोरिफुल इस्लामचा हृतिक स्टाइल डान्सचा व्हिडीओ...
दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून पॉइण्ट्स टेबलमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा फटका न्यूझीलंडला बसला असून त्यांची एका स्थानाने घसरण झाली आहे. सध्या भारतीय संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. भारताने आपले 5 ही सामने जिंकले असून 10 पॉइण्ट्ससहीत पहिलं स्थान मिळवलं आहे. दक्षिण आफ्रिकेने आपल्या 5 पैकी 4 सामने जिंकलेत. न्यूझीलंडनेही 5 पैकी 4 सामने जिंकले असले तरी नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या 4 पैकी 2 सामने जिंकले असून ते चौथ्या स्थानी आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ प्रत्येकी 2 विजयासहीत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहे. नेदरलॅण्ड, श्रीलंका, इंग्लंड आणि बांगलादेशने प्रत्येकी एक सामना जिंकला असून हे संघ अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहव्या स्थानी आहेत.