ICC player rankings No 1 ODI bowler: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आज मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये वर्ल्ड कप 2023 ची पहिली सेमी-फायनल रंगणार आहे. मात्र या सामन्याआधीच भारताला एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलच्या एकदिवसीय क्रिकेटच्या गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताच्या मोहम्मद सिराजची घसरण झाली आहे. मोहम्मद सिराजने काही दिवसांपूर्वीच आयसीसी ओडीआय बॉलिंग रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं. मात्र आता दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने मोहम्मद सिराजला खाली ढकलत पहिलं स्थान पटकावलं आहे.
केशव महाराजचं एकूण रेटिंग 726 इतकं आहे. तर सिराजचं रेटिंग 723 इतकं आहे. केशव महाराजने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरसारी 24.71 इतकी असून इकनॉमी (प्रत्येक ओव्हरला किती धावा देतो) केवळ 4.37 इतकी आहे. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये केशव महाराज तिसऱ्या स्थानी आहे. त्याने पुण्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये 46 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या.
केशव महाराजने भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये 10 ओव्हरमध्ये केवळ 30 धावा देत एक विकेट घेतली होती. केशव महाराजने फलंदाजीमध्येही चमक दाखवली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये 48 व्या ओव्हरमध्ये त्याने विजयी चौकार लगावला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अवघ्या एका विकेटने दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला होता.
मोहम्मद सिराजने वर्ल्ड कपमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. 9 सामन्यांमध्ये 28.83 च्या सरासरीने 5.20 च्या इकनॉमीने गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजचा नवीन बॉलिंग पार्टनर असलेल्या जसप्रीत बुमराहनेही 2 स्थानांनी उडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह हा चौथ्या स्थानी आहे. त्याचं रेटिंग 687 इतकं आहे. कुलदीप यादवनेही 2 स्थानांनी झेप घेतली आहे. तो पाचव्या स्थानी असून त्याचं रँकिंग 682 इतकं आहे.
गोलंदाजांबरोबरच फलंदाजांसाठीचं नवीन रॅकिंग जाहीर झालं आहे. फलंदाजांच्या रँकिंगमध्येही भारताला फटका बसला आहे. पहिल्या स्थानी शुभमन गिल आहे. 24 वर्षीय गिलच्या नावावर 832 रेटिंग्स आहेत. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं. बाबर आझम 824 रेटिंग्ससहीत दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीला नवीन रँकिंगमध्ये फटका बसला आहे. विराट एका स्थानाने खाली घसरला आहे. विराट सध्या चौथ्या स्थानी आहे. विराटचे रेटिंग्ज 772 इतके आहे. विराटची जागा दक्षिण आफ्रिकेचा विकेट-किपर बॅट्समन क्विंटन डी कॉकने घेतलं आहे. क्विंटन डी कॉकचं रेटिंग 773 इतकं आहे.