भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या सामन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील 49 वं शतक ठोकलं. या शतकासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 326 धावा केल्या. विराट कोहलीने या सामन्यात 121 चेंडूत 101 धावा केल्या. एकीकडे विराटने शतक केल्याने आनंद व्यक्त होत असताना, काहींना मात्र त्याने फार धीम्या गतीने खेळी करण्यावरुन नाराजी जाहीर केली. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा यांनी स्फोटक खेळी केली असताना, विराट मात्र अत्यंत सुरक्षितपणे खेळल्यानंतर तो शतकासाठीच खेळला अशी टीका होत आहे. दरम्यान स्वत: कोहलीनेच यामागील कारण स्पष्ट करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या शतकांची बरोबरी केल्यानंतर संवाद साधताना ही खेळपट्टी किती अवघड आहे हे समजावलं. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची विकेट गेल्यानंतर ड्रेसिंग रुममधून विराट कोहलीसाठी संदेश पाठवण्यात आला होता. तू एका बाजूला विकेट सांभाळून ठेव आणि इतरांना फटकेबाजी करु दे असं या संदेशात सांगण्यात आलं होतं असा खुलासा स्वत: विराटने केला आहे.
"या खेळपट्टीवर खेळणं थोडं अवघड होतं. रोहित आणि शुभमन यांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. तो सूर कायम ठेवणं ही माझी जबाबदारी होती. 10 व्या ओव्हरला चेंडू फिरु लागला होता. तो धीम्या गतीने बॅटवर येत होता. विकेट टिकवून संयमाने खेळणं आणि इतरांना खेळू देणं ही माझी जबाबदारी होती. संघ व्यवस्थापनाकडून मला हेच सांगण्यात आलं होतं," अशी माहिती विराट कोहलीने दिली.
विराट कोहलीव्यतिरिक्त श्रेयस अय्यरनेही 87 चेंडूत 77 धावा करत दमदार खेळी केली. विराटने श्रेयस अय्यरसोबतच्या भागीदारीवरही भाष्य केलं. सराव करताना आम्ही याचाही सराव केल्याचं त्याने सांगितलं. "श्रेयस अय्यर फार चांगला खेळला आणि अखेरच्या क्षणांमध्ये संघाला धावा करुन दिल्या. आशिया कपदरम्यान आमच्यात फार चर्चा झाली. आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. ही भागीदारी फार गरजेची होती. विकेट पडली तर फार महाग पडेल याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे आम्हाला फार काळ टिकणं गरजेचं होतं," असं विराट म्हणाला.
आपल्या शतकाबद्दल बोलताना विराटने सांगितलं की, "मला ही संधी दिल्याबद्दल तसंच संघाच्या यशात योगदान दिल्याबद्दल देवाचा आभारी आहे. वाढदिवशीच शतक झाल्याचा मला आनंद आहे"