Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून देश सावरत आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव केला. पराभवामुळे भारतीय खेळाडू फारच निराश झाले. या खेळाडूंना धीर देण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये गेले होते. यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु असून राजकीय वादही निर्माण झाला आहे. अशातच संघाचे माजी प्रशिक्षक आणि विद्यमान समालोचक रवी शास्त्री यांनी मोदींच्या या ड्रेसिंग रुमभेटीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रवी शास्त्री यांनी मोदींच्या या भेटीबद्दल आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं. "मी ड्रेसिंग रुममध्ये एक क्रिकेटपटू म्हणून आणि त्यानंतर अनेक वर्ष एक प्रशिक्षक म्हणून वावरलो आहे. अशावेळेस (मोठ्या सामन्यात पराभव होतो तेव्हा) फार वाईट वाटतं. एवढ्या शेवटापर्यंत पोहचून पराभव होतो तेव्हा पराभव जिव्हारी लागतो. मात्र तुम्हाला वाईट वाटत असताना थेट देशाचे पंतप्रधान तुमच्या ड्रेसिंग रुममध्ये येतात तेव्हा तो क्षण फार मोठा असतो," असं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.
"पंतप्रधान ड्रेसिंग रुममध्ये आल्याने खेळाडूंमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. कारण पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुममध्ये जाणं हे काही सर्वसामान्य व्यक्तीने तिथं जाण्यासारखी गोष्ट नाही. मला ठाऊक आहे की पंतप्रधानांनी भेट दिल्यानंतर खेळाडूंना कसं वाटलं असेल. मी भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना हे दृष्य यापूर्वी पाहिलं आहे," असंही रवी शास्त्री म्हणाले.
आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजला मैदानातच अश्रू अनावर झाले. विराट कोहलीही मैदानातून बाहेर पडताना तोंड लपवूनच बाहेर पडला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मैदानात उपस्थित होते. भारताचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला. मोदींचा भारतीय ड्रेसिंग रुममधील फोटो सर्वात आधी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पोस्ट केलेला. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.
शमीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी शमीला मिठी मारताना दिसत आहेत. मोदी कौतुकाने शमीला शब्बासकी देतानाच त्याला धीर देत असल्याचं फोटोत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, "दुर्देवाने कालचा दिवस आमचा नव्हता. संपूर्ण स्पर्धेमध्ये मला आणि आपल्या संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीयांचे मी आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो जे स्पेशली ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु" असं शमीने म्हटलं आहे. मोहम्मद शमी हा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानेही पराभवामुळे आम्हा सर्वांची निराशा झाली असली तरी चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही पुढे वाटचाल करत राहू असं म्हटलं आहे. तसेच जडेजाने पंतप्रधान मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन धीर दिल्याचं सांगत मोदींबरोबरच ड्रेसिंग रुममधील फोटोही पोस्ट केला आहे.
We had a great tournament but we ended up short yesterday. We are all heartbroken but the support of our people is keeping us going. PM @narendramodi’s visit to the dressing room yesterday was special and very motivating. pic.twitter.com/q0la2X5wfU
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 20, 2023
वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने 241 धावाचं लक्ष दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. 47 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 3 गडी तंबूत परतले होते. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबूशेनने 192 धावांची पार्टनरशीप केली. हेडने शतक झळकावत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा 7 वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.