World Cup IND v BAN Virat Kohli Wide Ball Rule: बांगलादेशविरुद्धच्या वर्ल्ड कप 2023 च्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. या सामन्यामधील विजयापेक्षा अधिक चर्चा झाली ती सामन्याच्या शेवटच्या काही ओव्हरमधील रंजक ड्रामा. भारताला जिंकण्यासाठी 2 तर विराट कोहलीला त्याचं 48 वं शतक झळकावण्यासाठी 3 धावा आवश्यक होता. बांगलादेशचा फिरकीपटू नसुम अहमदने टाकलेला पहिला चेंडू लेग स्टम्प बाहेरुन गेला. हा बॉल विराटच्या पायाच्या मागून थेट विकेटकीपरच्या हातात स्थिरावल्यानंतर पंच रिचर्ड केटलब्रो (Richard Kettleborough) आता हा चेंडू वाईड देणार असं अनेकांना वाटत होती. मात्र रिचर्ड केटलब्रो यांनी हा चेंडू वाईड दिला नाही. या निर्णयामुळे विराट कोहलीला शतक झळकावणं अधिक सुखकर झालं असं सांगितलं जात आहे. विराटने याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावत शतक झळकावलं आणि भारताला विजयही मिळवून दिला.
चेंडू कशालाही स्पर्श न करता वाईड गेला असतानाही पंच रिचर्ड केटलब्रो यांनी तो वाईड घोषित न केल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे. रिचर्ड केटलब्रो यांच्यावर टीकेचा भडीमार होत असतानाच केवळ विराटला मदत करण्यासाठी पंचांनी नियमांची पायमल्ली केल्याचीही तक्रार काहींनी सोशल मीडियावरुन केली आहे. मात्र या घडलेल्या प्रकारामगील सत्य काय आहे? पंचांनी खरोखरच कोहलीची मदत करण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष केलं? नसुमचा वाईडचा चेंडू पंचांनी मुद्दाम योग्य असल्याचं ठरवलं का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. नेमका वाईडचा नियम काय आहे आणि नियमांच्या आधारे या साऱ्याकडे कसं पाहता येईल हे समजून घेऊयात...
क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेलबर्न क्रिकेट क्लबने वाईडची व्याख्या स्पष्ट केली आहे. कोणत्या चेंडूला वाईड म्हणतात हे निश्चित करण्यात आलं आहे. एमसीसीच्या आर्टिकल 22.1.1 प्रमाणे, "क्रिकेटमधील वाईड चेंडूसंदर्भातील नियमांप्रमाणे, चेंडू स्ट्रायकरपासून (फलंदाजापासून) दूर पडला आणि साधा क्रिकेट शॉट मारण्यासाठी फलंदाजाला चेंडूपर्यंतही पोहोचता येत नसेल एवढ्या दूर चेंडू पडल्यास तो वाईड आहे असं म्हटलं जाईल," असं नमूद केलं आहे.
अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने मागील वर्षी सर्वात छोट्या स्वरुपाच्या म्हणजेच टी-20 क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर वाईडचे काही नियम बदलले आहेत. सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये फटकेबाजी करण्याच्या उद्देशाने गोलंदाज चेंडू फेकण्याआधीच फलंदाज अनेकदा क्रिजमध्ये इकडे तिकडे हलचाल करतात. फलंदाजाने अशी हालचाल केल्यानंतर अनेकदा गोलंदाजाने लेग स्टम्प बाहेर टाकलेला चेंडू पंच सरळ वाईड द्यायचे. म्हणजेच फलंदाजांना हलचालीची मूभा असली तरी गोलंदाजांना ती नव्हती. त्यामुळे हा गोलंदाजांवर अन्याय असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झालेली. याची दखल घेत वाईड बॉलच्या नियमामध्ये म्हणजेच 22.1 मध्ये बदल करण्यात आला. यामध्ये असा बदल करण्यात आला की चेंडूला वाईड घोषित करण्याआधी मैदानावरील पंच फलंदाज चेंडू टोलवण्यासाठी कोणत्या अवस्थेत उभा आहे याची दखल घेतील. केवळ चेंडू ऑफ किंवा लेग स्टम्प बाहेर जातोय एवढं एकच परिणाम वाईड घोषित करताना लावलं जाणार नाही, असं नवीन नियमांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> विराटच्या शतकासाठी Wide नकारणाऱ्या अंम्पायरचं धोनी कनेक्शन आलं समोर! वाचून व्हाल थक्क
आता भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात पंच रिचर्ड केटलब्रो यांनी दिलेला निर्णय योग्य की अयोग्य याबद्दल बोलायचं झालं तर पूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून काम केलेल्या विनायक कुलकर्णी यांनी आपलं मत मांडलं आहे. "एकदिवसीय क्रिकेटमध्ये सामान्यपणे चेंडू तेव्हा वाईड असतो जेव्हा तो लेग स्टम्पच्या बाहेर टप्पा पडतो आणि बाहेर निघून जातो. मात्र याचबरोबर अजून एक गोष्टही येथे महत्त्वाची असते. फलंदाज आपल्या जागेवरुन हलला नाही आणि चेंडू त्याच्या अगदी जवळून कशालाही स्पर्श न करता लेग स्टम्पच्या जवळून गेला तरी त्याला वाईट घोषित केलं जात नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर फलंदाज कोणत्या पोझिशनमध्ये चेंडू टोलवण्याचा प्रयत्न करत आहे हे विचारात घेऊन निर्णय दिला जातो. फलंदाज फार हलचाल करत असेल तर त्याची मूळ पोझिशन लक्षात घेऊन त्याच्या पाया जवळून लेग साईडने जाणारा चेंडू वाईड घोषित केला जात नाही," असं कुलकर्णी म्हणाले.
— Dr.Arun (@myselfarun90) October 19, 2023
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये फिरकीपटू नसुम अहमद गोलंदाजी करण्यासाठी रनअप घेऊ लागला तेव्हा विराट कोहली ऑफ साईडला गेला होता. पंचांच्या दृष्टीकोनातून विराट चेंडू खेळण्यासाठी आपल्या जागेवरुन हलला नसता तर तो बॉल त्याच्या पॅडला लागला असता. त्यामुळेच पंचांनी चेंडू वरवर लेग साईडने जात असल्याचं दिसत होतं तरी चेंडू वाईड ठरवला नाही.