ब्लॉग रवि पत्की झी मीडिया, मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड हा जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना 18 ते 22 जून च्या दरम्यान इंग्लंड मधील साउथहॅम्प्टन येथे रंगणार आहे. कसोटी क्रिकेटची सर्वात मोठी इव्हेंट आणि ती लॉर्ड्सला नाही म्हणल्यावर सर्वांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.पण कोव्हिड काळात स्टेडियमला लागून खेळाडूंसाठी हॉटेल असेल अशी ठिकाणे निवडली जात आहेत. साउथेम्प्टन त्या निकषात चपखल बसते.
कुठे आहे साउथेम्प्टन?
लंडन पासून रेल्वे ने दीड तासाच्या अंतरावर हे टुमदार गाव आहे. हॅम्पशायर काउंटीचे हे क्रिकेट हेड क्वार्टर आहे. साउथेम्प्टन रेल्वे स्टेशन ची मजा अशी आहे की प्लॅटफॉर्म वरून उतरून रस्ता क्रॉस केला की आपण विमानतळात शिरतो इतके स्टेशन आणि विमानतळ चिकटून आहेत.गावात सिटी सेन्टर सोडले तर उंच इमारती दिसत नाहीत.सगळीकडे टुमदार बंगले आणि शेजारी शेजारी जेमतेम दोन गाड्या जाऊ शकतील असे छोटे रस्ते असलेले हे छोटेसे गाव लंडनच्या दक्षिण पश्चिमेला आहे.
साउथेम्प्टनचे आधीचे स्टेडियम खूपच गजबज असलेल्या ठिकाणी आणि इमारतीनी वेढलेले होते. अनेक वर्षे नवीन स्टेडियम ची इच्छा तिथल्या खेळाडूंची होती. हँपशायरचा अनेक वर्षे कर्णधार असलेला मार्क निकोलस आणि काऊंटीचे उपाध्यक्ष बिल ह्यूज यांनी लीड्सच्या हॉटेल मध्ये बसून नवीन स्टेडियमची योजना आखली.
साउथेम्प्टन गावाबाहेर वेस्ट एन्ड ह्या कंट्री साईडला डोंगर उतारावर ऑक्सफर्डच्या क्विन्स कॉलेजची मोकळी जमीन निश्चित करण्यात आली. इंग्लंडचे प्रख्यात आर्किटेकट मायकेल हॉपकिन्स यांनी स्टेडियमला अँफिथिएटरचे रूप दिले. म्हणून स्टेडियमला बोल म्हणतात.
दोन कोटी पौंड खर्च करून नितांत सुंदर वास्तू उभी राहिली. परंतु टेस्ट सामन्या करता काही निकष पुरे होत नव्हते. तेव्हा फार्मा कंपनीचे उद्योगपती रॉड ब्रांसग्रोव्ह यांनी आर्थिक मदत करून स्टेडियमची क्षमता 15000 केली तसेच शेजारीच हिल्टन हॉटेल झाले. ब्राँसग्रोव हेच आता काउंटीचे सर्वेसर्वा आहेत.
स्टेडियमला जाताना गावाच्या मध्यापासून अर्धा तास ड्राइव्ह करावे लागते. स्टेडियमच्या बाहेर एक छोटे गवताचे बेट तयार केले आहे. त्यात बॅट्समन,बॉलर्स यांची शिल्पे लावली आहेत. स्टेडियमचे नाव आधी रोझ बोल होते. कारण हॅम्पशायरच्या लोगोमध्ये गुलाबाचे फुल आहे. पुढे एजियस नावाची विमा कंपनी प्रायोजक झाल्यावर स्टेडियम चे नाव एजियस बोल झाले.
शेन वॉर्न ह्या काउंटी मधून खेळू लागल्या पासून काउंटी ला वजन प्राप्त झाले.(हॅम्पशायर कडून खेळलेला एकटा भारतीय म्हणजे अजिंक्य रहाणे) 2011 पासून इथे कसोटी सामन्याला सुरुवात झाली. इथे आत्ता पर्यंत फक्त 6 कसोटी खेळल्या गेल्या आहेत. मिडलसेक्स,सरे,लँकाशायर ह्यांच्या इतकी ही काउंटी तगडी नाही. दोनदाच काउंटी स्पर्धा हॅम्पशायरने जिंकली आहे.
सुंदर महिरप असलेले पॅविलिअन, उत्कृष्ट प्रेस बॉक्स, आरामदयी आसन व्यवस्था आणि खिलाडू खेळपट्टी ह्यामुळे साउथेम्प्टनला क्रिकेटचा आणि नयनरम्यातेचा विलक्षण अनुभव मिळतो. जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्या करता खेळाडूंना स्फूर्ती देईल असे हे व्यासपीठ आहे. अंतिम सामना रंगतदार होईल अशी आशा करूया.