मुंबई : टेस्ट क्रिकेटला वाचवण्यासाठी आणि टेस्ट मॅच बघण्यासाठी प्रेक्षक यावेत म्हणून आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात केली आहे. २०१९ ते २०२१ ही दोन वर्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप चालणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला आणखी रोमांचक करण्यासाठी खेळाडूंच्या जर्सीमध्येही बदल करण्यात आले. वनडे आणि टी-२० प्रमाणेच टेस्ट क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचं नाव आणि नंबर टाकण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी आयसीसीने पॉईंट्सची वेगळी संकल्पनाही सुरु केली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या प्रत्येक सीरिजसाठी पॉईंट्स देण्यात यावेत, अशी मागणी सुरुवातीला झाली होती. पण सीरिजसाठी पॉईंट्स असले तर टीम मॅच जिंकण्याऐवजी मॅच ड्रॉ करण्याचाच प्रयत्न करतील, ज्यामुळे टेस्ट क्रिकेट रोमांचक होणार नाही, असं मत आयसीसीच्या क्रिकेट समितीने मांडलं. त्यामुळे प्रत्येक मॅचसाठी पॉईंट्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे हा आयसीसीच्या क्रिकेट समितीचा प्रमुख आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये प्रत्येक टीमला एका सीरिजसाठी जास्तीत जास्त १२० पॉईंट्स मिळू शकतात. म्हणजेच सीरिज २ टेस्ट मॅचची असेल तर प्रत्येक मॅच जिंकण्याचे ६० पॉईंट्स जिंकता येणार आहे. याचप्रमाणे जर सीरिज ३ टेस्ट मॅचची असेल तर प्रत्येक मॅच जिंकल्यावर ४० पॉईंट्स, ४ टेस्ट मॅचची सीरिज असेल तर प्रत्येक मॅच जिंकण्याचे ३० पॉईंट्स आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज असेल, तर प्रत्येक मॅच जिंकण्याचे २४ पॉईंट्स मिळणार आहेत.
२ टेस्ट मॅचच्या सीरिजमधली मॅच ड्रॉ झाली तर प्रत्येक टीमला २० पॉईंट्स, ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमधली मॅच ड्रॉ झाली तर १३.३ पॉईंट्स, ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमधली मॅच ड्रॉ झाली तर १० पॉईंट्स आणि ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमधली मॅच ड्रॉ झाली तर ८ पॉईंट्स मिळतील.
२ टेस्ट मॅचच्या सीरिजमधील मॅच टाय झाली तर प्रत्येक टीमला ३० पॉईंट्स, ३ टेस्ट मॅचच्या सीरिजची मॅच टाय झाली तर २० पॉईंट्स, ४ टेस्ट मॅचच्या सीरिजची मॅच टाय झालीतर १५ पॉईंट्स आणि ५ टेस्ट मॅचच्या सीरिजची मॅच टाय झाली तर १२ पॉईंट्स मिळणार आहेत.
२०१९-२०२१ ही दोन वर्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळवण्यात येणार आहे. २०२१मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये एकच टेस्ट मॅच खेळवण्यात येईल.