मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वी जैसवालचं हजारे ट्रॉफीत द्विशतक

पाणीपुरी विकून क्रिकेट खेळण्याची कहाणी

Updated: Oct 17, 2019, 10:04 AM IST
मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वी जैसवालचं हजारे ट्रॉफीत द्विशतक title=

बंगळुरू : मुंबईचा युवा खेळाडू यशस्वी जैसवाल याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावलं आहे. हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक करणारा जयसवाल तिसरा खेळाडू बनला आहे. जैसवालने झारखंडविरुद्ध ग्रुप-ए मॅचमध्ये २०३ रनची खेळी केली. या मोसमात द्विशतक करणारा जैसवाल दुसरा खेळाडू आहे. याआधी संजू सॅमसनने केरळकडून खेळताना गोव्याविरुद्ध नाबाद २१२ रन केले होते. विजय हजारे स्पर्धेतला हा सर्वाधिक स्कोअर आहे.

१७ वर्षांचा यशस्वी जैसवाल लिस्ट-ए क्रिकेट (मर्यादित ओव्हर) मध्ये द्विशतक करणारा नववा भारतीय बॅट्समन बनला आहे. या ९ पैकी ५ द्विशतकं वनडेमध्ये करण्यात आलेली आहेत. रोहित शर्माच्या नावावर ३, सेहवाग आणि सचिनच्या नावावर प्रत्येकी १-१ द्विशतक आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिलं द्विशतक मागच्या मोसमात उत्तराखंडच्या कर्णवीर कौशलने कतेलं होतं. त्याने सिक्कीमविरुद्ध २०२ रन केले होते.

मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या यशस्वी जैसवालची कहाणी संघर्षमय आहे. यशस्वीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न होतं. भदोहीमध्ये त्याच्या वडिलांचं छोटं दुकान आहे. वडिलांकडे क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून यशस्वी १०-११ वर्षाचा असताना मुंबईत काकाकडे आला. काकाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. अखेर काकांच्या सांगण्यावरून यशस्वीला मुस्लिम युनायटेड क्लबने आपल्या टेंटमध्ये राहण्याची परवानगी दिली. याठिकाणी आणखी काही मुलंही राहत होती.

यशस्वी जैसवालला वडिल पैसे पाठवत होते, पण त्याला हे पैसे पुरत नव्हते. त्यामुळे त्याने क्रिकेट खेळून उरलेल्या वेळेत काम करायचं ठरवलं. पैसे कमवण्यासाठी यशस्वी पाणी पुरी आणि फळं विकायचा. याच्यातून त्याला थोडेफार पैसे मिळायचे.